Nuclear Safe Country : अणुबॉम्बच्या हल्ल्याने विध्वंस झाला तरी 'हे' देश राहतील अगदी सुरक्षित! पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:14 IST2025-05-15T18:09:13+5:302025-05-15T18:14:29+5:30

अवघ्या जगाला सध्या अणुबॉम्ब हल्ल्याची भीती सतावत आहे. पण, अणुबॉम्ब हल्ल्यातही कोणते देश सुरक्षित राहू शकतील हे तुम्हाला माहीत आहे का?

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान, जगाला अणुबॉम्ब हल्ल्याची भीती सतावत आहे. पाकिस्तानचे नेते सतत अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमक्या देत आहेत. 'मिरर'च्या अहवालात म्हटले आहे की, जर जागतिक अणुयुद्ध झाले तर, जगातील ६० टक्के लोकसंख्या ७२ मिनिटांत नष्ट होऊ शकते.

'नेचर फूड'च्या अहवालात म्हटले आहे की, जर जगात तिसऱ्या महायुद्धाच्या रूपात अणुयुद्ध झाले तर त्याचे परिणाम विनाशकारी असतील. अणुबॉम्ब हल्ल्यात लाखो लोकांच्या मृत्युसोबतच, शेती, व्यवसाय आणि पर्यटन कोसळून बहुतेक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होतील. जगभरातील ६.७ अब्ज लोक उपासमारीने मरून जातील. अनेक देशांमध्ये त्सुनामीचा धोका निर्माण होईल. अमेरिका, कॅनडा, युरोप आणि रशियामध्ये दुष्काळ पडू शकतो.

तिसऱ्या महायुद्धामुळे जगात भयानक विनाशाचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. यामुळे पृथ्वीचे अस्तित्वही धोक्यात येऊ शकते. संयुक्त राष्ट्रांसारख्या अनेक जागतिक संस्थांच्या अपयशामुळे अणु हल्ल्याचा धोका वाढला आहे. भारत, पाकिस्तान आणि चीन हे अण्वस्त्रांनी समृद्ध देश आहेत, ज्यांच्यामध्ये सध्या सीमा वाद सुरू आहे. मात्र, काही देश असेही आहेत जे या हल्ल्यातही सुरक्षित राहू शकतात.

पर्वतांनी वेढलेला, भूतान हा जगातील असा एक देश आहे, जो त्याच्या वेगळ्या भौगोलिक स्थानामुळे जागतिक अशांततेपासून स्वतःला नेहमीच दूर ठेवत असतो. त्यांच्याकडे स्वतःचे सैन्यही नाही. १९७१ मध्ये, भूतानला संयुक्त राष्ट्रांकडून स्वतंत्र देशाचा दर्जा मिळाला. जर जगातील मोठ्या देशांमध्ये संघर्ष झाला, तर भूतान अणुबॉम्ब हल्ल्यापासून सर्वात सुरक्षित असणाऱ्या देशांच्या यादीत असेल.

अलिप्ततावादी धोरण स्वीकारणाऱ्या देशांमध्ये आशियाई देश 'इंडोनेशिया'चा समावेश आहे. जगातील मोठ्या युद्धात त्यांनी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. तिसऱ्या महायुद्धादरम्यान जरी अणुहल्ला झाला तरी इंडोनेशिया कोणत्याही देशाची बाजू घेणार नाही. त्यांचे परराष्ट्र धोरण अमेरिका, चीन किंवा कोणत्याही मोठ्या देशाकडे झुकणारे नाही.

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाणारे स्वित्झर्लंड देखील जागतिक राजकारणाच्या संघर्षापासून दूर राहते. युरोपियन देश स्वित्झर्लंड कॅन्टन्समध्ये विभागलेला आहे आणि तिथे अगदी लहान निर्णयांसाठी देखील जनमत चाचणी घेतली जाते. तिथल्या सरकारांना आणि लोकांनाही फारशा राजकीय महत्त्वाकांक्षा नाहीत. तरीही, युरोपला असलेला धोका लक्षात घेता, अशा हल्ल्यात जनता सुरक्षित राहावी म्हणून येथे अणुबंकर बांधण्यात आले आहेत.

न्यूझीलंड आणि आयलँड हे देखील अशा देशांमध्ये सामील आहेत, जे अणुयुद्धतही अगदी सुरक्षित राहू शकतात. पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धात किंवा अशा कोणत्याही मोठ्या युद्धात न्यूझीलंडने कोणाचीही बाजू घेतली नाही. आयलँडनेही आतापर्यंत युद्धात तटस्थता राखली आहे. तो जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक आहे.

बर्फाळ पर्वतांनी वेढलेला अंटार्क्टिका अणु हल्ल्यापासून सर्वात सुरक्षित मानला जातो. अशा हल्ल्यांदरम्यान, लाखो लोक या ठिकाणी आश्रय घेऊ शकतात. डेन्मार्कच्या मालकीचे ग्रीनलँड देखील संकटाच्या काळातही सुरक्षित मानले जाते.