तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 22:05 IST2025-05-25T22:00:54+5:302025-05-25T22:05:09+5:30

Political Love Story: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनी सोशल मीडियावरून एका तरुणीसोबच्या प्रेमसंबंधांची कबुली दिल्याने मोठ्या वादाला तोंड फुटले होते. तेजप्रताप यांनी आपलं अकाऊंट हॅट झाल्याचा दावा करून या प्रकरणी सारवासारव केली होती. मात्र लालूप्रसाद यादव यांनी आज तेजप्रताप यादव यांच्यावर कठोर कारवाई करताना त्यांना पक्ष आणि कुटुंबातून बाहेर काढले होते.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनी सोशल मीडियावरून एका तरुणीसोबच्या प्रेमसंबंधांची कबुली दिल्याने मोठ्या वादाला तोंड फुटले होते. तेजप्रताप यांनी आपलं अकाऊंट हॅट झाल्याचा दावा करून या प्रकरणी सारवासारव केली होती. मात्र लालूप्रसाद यादव यांनी आज तेजप्रताप यादव यांच्यावर कठोर कारवाई करताना त्यांना पक्ष आणि कुटुंबातून बाहेर काढले होते.

तेजप्रताप यांचं प्रेमप्रकरण आणि त्यावरून झालेल्या वादानंतर आता अनेक बड्या नेत्यांची प्रेमप्रकरणं आणि त्यावरून झालेले वाद नव्याने चर्चेत आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही प्रमुख नेत्यांची प्रेमकहाणी आणि त्यावरून झालेल्या वादांचा घेतलेला हा आढावा.

भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची लव्हस्टोरी त्या काळी चांगलीच गाजली होती. संघाच्या विचारसणीचे पाईक असूनही सुशीलकुमार मोदी यांनी ख्रिश्चन असलेल्या जेसी जॉर्ज यांच्याशी विवाह केला होता. पाटणा विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली होती. त्यनंतर १९८६ मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले होते. मात्र जेसी यांनी लग्नानंतर धर्म बदलला नाही. हा विवाह तेव्हा खूप वादात सापडला होता. मात्र सुशील मोदी आपल्या प्रेमावर ठाम राहिले होते.

जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री राधिका यांच्याशी गुपचूपपणे विवाह केला होता. २००६ मध्ये आम्ही विवाहबद्ध झालो होतो, तसेच आम्हाला एक मुलगीही आहे, असा गौप्यस्फोट राधिका यांनी २०१० मध्ये केला होता. मात्र कुमारस्वामी हे आधीपासूनच विवाहित असल्याने या लग्नावरून मोठा वाद झाला होता. त्यावरून कुमारस्वामी हे वैवाहिक आणि कौटुंबिक पातळीवर अडचणीत सापडले होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि पत्रकार अमृता राय यांनी २०१४ मध्ये आपलं नातं सार्वजनिक केलं होतं. दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हा मोठा वाद झाला होता. अमृता राय आधीपासून विवाहित होत्या. तसेच दोघांच्या वयामध्ये असलेलं अंतरही चर्चेचा विषय ठरलं होतं. मात्र कुटुंब आणि समाजाची पर्वा न करता २०१५ मध्ये विवाह केला होता.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि व्यावसायिक सुनंदा पुष्कर यांची प्रेमकहाणीही तेव्हा चर्चेचा विषय ठरली होती. २०१० साली दोघेही विवाहबद्ध झाले होते. मात्र पुढे सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद पद्धतीने झालेल्या मृत्युमुळे शशी थरूर हे अडचणीत सापडले होते.

हरयामाचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रमोहन यांची प्रेमकहाणीही चर्चेचा विषय ठरली होती. आधीपासून विवाहित असलेल्या चंद्र मोहन यांनी अनुराधा बाली (फिजा) यांच्यासोबत विवाह करण्यासाठी इस्लामधर्म स्वीकारला होता. त्यावरून मोठा वाद झाला होता. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. तसेच पुढे अनुराधा बाली यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. तर चंद्र मोहन यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली.