'२० कोटींचे कर्ज, जीवे मारण्याची धमकी...', प्रवीण मित्तलने सांगितला कुटुंबाने का निवडला मृत्यूचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:47 IST2025-05-27T14:13:04+5:302025-05-27T15:47:29+5:30

हरियाणातील पंचकुला येथे सोमवारी रात्री उशिरा एकाच कुटुंबातील सात सदस्यांनी कारमध्ये विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केल्याच्या प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे.

हरियाणातून मंगळवारी सकाळी आलेल्या एका बातमीने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. हरियाणाच्या पंचकुला येथे एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली. गाडीत सर्वजण वेदनेने तडफडत होते. मृतांमध्ये डेहराडून येथील रहिवासी प्रवीण मित्तल (४२), प्रवीणचे आई वडील, प्रवीणची पत्नी आणि दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.

कुटुंबप्रमुख असलेल्या प्रवीण मित्तलने फक्त एवढेच सांगितले की त्याच्यावर खूप कर्ज होते आणि म्हणूनच संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. असे बोलून तोही खाली पडला. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र आता या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत.

प्रवीण मित्तल हा मूळचा हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील बारवाला येथील रहिवासी होता. त्याने पंचकुला येथे एक भंगार कारखाना उभारला होता. हळूहळू कारखाना तोट्यात गेला आणि प्रवीणच्या डोक्यावरचे कर्ज वाढतच गेले. या काळात प्रवीणवर २० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झालं. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी तो तीन वर्षांपूर्वी कुटुंबासह डेहराडूनला राहायला आला.

बँकेकडून आणि ज्यांच्याकडून त्याने कर्ज घेतले होते त्यांच्याकडून प्रवीणला फोन येऊ लागले. कर्जदारही त्याला धमक्या देऊ लागले. या सगळ्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रवीण त्याच्या कुटुंबासह उत्तराखंडमध्ये गेला. मात्र प्रवीणने बँकेचे कर्ज फेडले नसल्याने बँकेने पंचकुला येथील त्याचे दोन फ्लॅट आणि कारखाना ताब्यात घेतला. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्याने टॅक्सी चालवायला सुरुवात केली.

प्रवीण आणि त्याच्या कुटुंबाने ज्या कारमध्ये आत्महत्या केली ती २०२१ मॉडेलची हुंडई ऑरा सीएनजी आहे. तिचा नंबर UK07DY3055 आहे. ही गाडी गंभीर सिंग नेगी यांच्या नावावर आहे. नेगीने प्रवीणसाठी गाडी त्याच्या नावावर घेतली होती. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी ते पंचकुला येथील बागेश्वर धामची हनुमान कथा ऐकून परतत होते.

प्रवीणच्या सासऱ्यांनी सांगितले की, "त्याचे लग्न २००९ मध्ये झाले. पूर्वी हे लोक पंचकुलामध्ये राहत होते पण त्यांनी खूप कर्ज घेतले होते. त्यानंतर त्याला पीओ घोषित करण्यात आले आणि ते तिथून निघून गेले. त्याचा कुटुंबाशी कोणताही संपर्क नव्हता. त्याने बँकेकडून १ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते आणि अनेक लोकांकडून पैसे घेतले होते, जे त्याने कधीही परत केले नाहीत."

प्रवीण मित्तल याचा मृत्यू होण्यापूर्वीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये तो बसलेला दिसत आहे. पोलिसांना गाडीतून दोन पानांची सुसाईड नोट सापडली. यामध्ये प्रवीण मित्तलने, मी दिवाळखोर झालो आहे. हे सर्व माझ्यामुळे घडले आहे. माझ्या सासऱ्यांना काहीही बोलू नका. अंत्यसंस्कारासह सर्व विधी माझ्या मामाचा मुलगा करेल, असं लिहीलं आहे.