Narendra Modi on Nepal Tour: अनुल्लेखाने मारणे म्हणजे काय? मोदी नेपाळला जाणार, पण चीनने उभारलेल्या विमानतळावर नाही उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 11:49 AM2022-05-10T11:49:29+5:302022-05-10T11:56:56+5:30

Narendra Modi on Nepal Tour Politics: लवकरच असा दिवस येणार आहे, भारत चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळला मोठा झटका देणार आहे, तो देखील अनुल्लेखाने.

काठमांडू : भारताची साथ सोडून चीनच्या नादाला लागलेले पाकिस्तान, श्रीलंकेसारखे देश आता भिकेला लागले आहेत. नेपाळदेखील त्याच वाटेवर आहे. नाकापर्यंत पाणी आल्याने नेपाळी पंतप्रधान अचानक भारत दौऱ्यावर आले होते. भारताने शेजारी देशाला मदत करण्याची माणुसकी दाखविली आहे. परंतू, लवकरच असा दिवस येणार आहे, भारत चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळला मोठा झटका देणार आहे, तो देखील अनुल्लेखाने.

विषय नेपाळच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेपाळ दौऱ्याचा आहे. मोदी बुद्ध जयंतीला नेपाळच्या दौऱ्यावर जात आहेत. परंतू ते या एकाच दौऱ्यात नेपाळ आणि चीनला मोठा दणका देणार आहेत.

पंतप्रधान मोदी गौतम बुद्धांचे जन्मस्थळ असलेल्या लुंबिनीला जाणार आहेत. त्याच दिवशी त्याच वेळी नेपाळ चीनने बनविलेल्या देशातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार आहे. लुंबिनी या विमानतळापासून केवळ १८ किमी दूर आहे.

मोदी किंवा भारतीय पंतप्रधान जेव्हा देशात किंवा विदेशात दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांचे विमान नजीकच्या विमानतळावर उतरते. त्यानंतर तेथून ते हेलिकॉप्टरने किंवा कारने कार्यक्रमस्थळी पोहोचतात. परंतू भारतीय अधिकाऱ्यांनी कुटनितीचा एक उत्तम उदाहरण भारतद्वेष्टे आणि दगाबाज देशांसमोर ठेवले आहे. मोदी चीनने बनविलेल्या या विमानतळावर उतरणार नाहीत.

जेव्हा मोदी लुंबिनीमध्ये जातील त्याचवेळी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा या विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. या घडामोडींमुळे नेपाळमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण मोदींच्या प्रभावाने आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आणि सोहळा झाकोळला जाणार आहे.

चीनने भारतीय सीमेवर कटकारस्थाने रचण्यास सुरुवात केली आहे. नेपाळच्या भैरवामध्ये भारताच्या सीमेपासून केवळ ६ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ बनविला आहे. यामागचे कारण वेगळे सांगायला नको. जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा भारताविरोधात या विमानतळाचा वापर करता येईल, हे चीनचे इप्सित आहे.

गेल्या १० वर्षांपासून ४० अब्ज नेपाळी रुपये खर्चून दरवर्षी १० लाख प्रवाशी ये-जा करतील असा मोठा विमानतळ चीनने उभारला आहे. परंतू, नेपाळी सरकारला त्याचे मार्केटिंग करता न आल्याने या विमानतळाची हवा काही झालेली नाही, आणि हा भूताचा विमानतळ बनून राहिला आहे.

नेपाळच्या या भैरवा विमानतळाजवळच भारतीय हवाई दलाचा गोरखपूरमध्ये हवाई तळ आहे. या एअरबेसला टक्कर देण्यासाठी चीनने ही खेळी खेळली आहे. हे नेपाळला माहिती असूनही स्वत: च्या फायद्यासाठी तेथील राज्यकर्त्यांनी भारताविरोधात गद्दारी केली आहे.

असे असले तरी भारतातून किंवा भारतीय हद्दीतून भैरवा विमानतळावर जाण्यास विमानांना बंदी आहे. कारण भारतीय लढाऊ विमाने या हवाई क्षेत्रात उड्डाणे घेत असतात. यामुळे जगभरातील एअरलाईन कंपन्यांना या विमानतळावर जाण्यासाठी ३०० किमीचा फेरा मारावा लागणार आहे.

दुसरीकडे मोदी लुंबिनीमध्ये आंतरराष्ट्रीय मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन करणार आहेत. तसेच त्यानंतर देऊबा आणि मोदी मिळून एका बौद्ध विहाराची कोनशिला देखील ठेवणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी याच विमानतळावर उतरल्यास त्याचा फायदा नेपाळला होईल, नेपाळने त्यांना विनंती करावी, अशी मागणी नेपाळी नेते अधिकाऱ्यांकडून होत आहे. असे झाल्यास चीनचे मनसुबे सफल होतील, परंतू भारत आणि मोदी तसे करणार नाहीत.