Narendra Modi: नवीन संसद भवन उभारणीच्या कामाला वेग, अशोक स्तंभाचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 03:28 PM2022-07-11T15:28:05+5:302022-07-11T15:37:07+5:30

केंद्रातील भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण असलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामात अब्जावधी रुपये खर्च होत आहेत.

केंद्रातील भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण असलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामात अब्जावधी रुपये खर्च होत आहेत.

पण, आता या इमारतीच्या खर्चात 282 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. काही सरकारी सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. त्यानंतर इमारतीचं काम वेगानं सुरू असून आज येथील अशोक स्तंभांचं अनावरण करण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाच्या छतावर बनविण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केलं. यावेळी, येथील बांधकामासाठी काम करणाऱ्या कामगारांसोबत संवादही साधला.

नव्या संसद भवनावरील हा अशोक स्तंभ 9500 किलो ग्रॅम वजनाच्या तांबे धातूपासून बनविण्यात आला आहे. या स्तंभाची उंची 6.5 मीटर एवढी आहे.

नवीन संसंद भवन इमारतीच्या मध्यवर्ती भागावर हा स्तंभ उभारण्यात आला आहे. त्यासाठी, फाऊंडेशन तयार करण्यासाठी 6500 किलो ग्रॅम वजनाच्या स्टील साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

नवीन संसद भवन इमारतीच्या कागदोपत्री बनवलेला आराखड्यापासून ते अशोक स्तंभाची प्रत्यक्ष निर्मित्ती ही प्रक्रिया 8 वेगवेगळ्या टप्प्यांमधून पार पडली आहे.

दरम्यान, संसद भवन प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर एक वर्षांहून अधिक कालावधीत प्रकल्पाची किंमत सुमारे 29 टक्क्यांनी वाढून सूमारे 1250 कोटी झाली आहे.

प्रस्तावित चार मजली इमारत सुमारे 13 एकर क्षेत्रात पसरली आहे. राष्ट्रपती भवनाच्या अगदी जवळ असलेला हा प्रकल्प यापूर्वी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य सोहळ्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.