संकटं संपता संपेना! 5 दिवसांत 100 लहान मुलं MIS-C च्या विळख्यात; वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 06:27 PM2021-05-28T18:27:59+5:302021-05-28T18:41:23+5:30

Multi Organ Inflammatory Syndrome : कोरोनासह इतर आजाराचा धोका हा चिमुकल्यांना देखील असलेला पाहायला मिळत आहे. यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 16 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

देशात ही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,75,55,457 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,86,364 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,660 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,18,895 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे.

कोरोनासह इतर आजाराचा धोका हा चिमुकल्यांना देखील असलेला पाहायला मिळत आहे. यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान आणखी एक धडकी भरवणारी माहिती आता समोर आली आहे.

लहान मुलांच्या आरोग्याबाबत संबंधीत असलेली हा माहिती हैराण करणारी आहे. लहान मुलांना कोरोनासह मल्टी-ऑर्गन इन्फ्लेमेटरी सिंड्रोमनेही (MIS-C - Multi Organ Inflammatory Syndrome) विळखा घातला आहे.

गेल्या पाच दिवसांत मल्टी-ऑर्गन इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचे तब्बल 100 पेक्षा अधिक प्रकरणं समोर आली आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक इन्सेन्टिव्ह केअरच्या (Indian Academy of Pediatric Intensive Care) डेटाचा हवाला देत हा रिपोर्ट देण्यात आला आहे.

उत्तर भारतात लहान मुलांमध्ये MIS-C मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कोरोना झालेल्या 4 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये हा सिंड्रोम आहे. काही दुर्मिळ प्रकरणात 6 महिन्यांच्या मुलांनाही हा आजार झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

तीन ते पाच दिवसांपर्यंत सतत ताप येणं हे MIS-C प्रमुख लक्षण आहे. तसेच चिमुकल्यांच्या पोटात देखील खूप दुखतं. ब्लड प्रेशर कमी होणं आणि लूज मोशन ही याची लक्षणं असल्याची माहिती मिळत आहे.

पंजाब, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये देखील याची काही प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळेच तज्ज्ञांनी आपल्या पालकांना मुलांची नीट घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीकडे बारीक लक्ष ठेवा असा सल्ला देखील दिला आहे.

जर लहान मुलांना तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ ताप येत असेल. तसेच अंग दुखत असेल तर याची गांभीर्याने दखल घ्या आणि वेळीच सावध व्हा. वेळ वाया न घालवता मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) लहान मुलांसाठी (Children's) सर्वाधिक धोकादायक असणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारचे म्हणणे याहून वेगळे आहे. एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी याचे कोणतेही पुरावे नाहीत असे म्हटले आहे.

गुलेरिया म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे मुलांना कमी प्रमाणावर संक्रमण झाले आहे. यामुळे आतापर्यंत तरी असे वाटत आहे की, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना संक्रमित करणार नाही.

अनेक संशोधकांनी लहान मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे म्हटले आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुले कोरोनाने प्रभावित झालेली नाहीत. त्यांना लसही दिलेली नाही. यामुळे ते तिसऱ्या लाटेत सर्वाधिक संक्रमित होतील, याचे काही पुरावे मिळालेले नाहीत, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे.

कोरोना संकटामुळे मुले आणि तरुणांवर झालेल्या परिणामांवर बोलताना एम्सने म्हटले की, लहान मुलांचे मानसिक तणाव, स्मार्टफोनची सवय आणि शैक्षणिक आव्हानांमधून अतिरिक्त नुकसान झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

Read in English