Modi@20! नरेंद्र मोदींची अशी कार्य, जी आजतागायत कुणालाही ठाऊक नाहीत; वाचा BJP चा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 02:38 PM2022-09-17T14:38:34+5:302022-09-17T14:42:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका पत्राने धरणग्रस्त शहरातील लोकांमध्ये अशी भावना निर्माण झाली ज्यामुळे ते संपूर्ण शहर पुनर्बांधणीसाठी उभे राहिले. २०१४ मध्ये मोदींनी स्वतः चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बोलून १५०० भारतीय सैनिकांची सुटका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह देशातील २२ सेलिब्रिटींनी या गोष्टी शेअर केल्या आहेत. या आठवणींना पुस्तकाचे स्वरूप देण्यात आले आहे. मोदींच्या २० वर्षांच्या कार्याला केंद्रस्थानी ठेवून हे पुस्तकही बाजारात आले आहे. त्याचे शीर्षक आहे 'Modi@20: सपने हुए साकार है'.

पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कारकिर्दीत लडाख बोर्डरवर चीनचं सैन्य भारतीय हद्दीत घुसून भारतात बनणाऱ्या रस्त्याचं कामकाज थांबवलं. इतकेच नाही तर चीनी सैनिकांनी १५०० भारतीय सैन्याला बंधक बनवलं. हा वाद १६ दिवस चालला. त्यावेळी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा अहमदाबाद येथे मोदींनी जिनपिंग यांच्याशी संवाद साधत सैनिकांना विनाअट सोडण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर या सैनिकांना सोडण्यात आले असं डोवाल यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी खूप व्यावहारिक आहेत. निवडणुकीचा मोठा विजय त्यांना प्रभावित करत नाही. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर मला राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले. मी पंतप्रधानांकडे गेलो आणि म्हटलं आम्ही पक्षाच्या सदस्य अभियानाचा विचार करत आहोत. तेव्हा त्यांनी झटपट जुन्या पद्धतीने करू शकणार नाही. त्यानंतर मोदींनी मिस्ड कॉल आधारित सदस्यता अभियान सुरु करण्याची आयडिया दिली. प्रत्येक मिसकॉल्डला व्हेरिफाय करण्याची सूचनाही मोदींनी दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

२० मे २०१४ चा किस्सा आहे. माझ्याकडे अरुण जेटलींचा कॉल आला. त्यांनी गुजरात भवनला भेटायला बोलावले. तिथे जाऊन कळालं मला नरेंद्र मोदींना भेटायचं आहे. मी मोदींना कधी भेटलो नव्हतो त्यामुळे मला काही सूचत नव्हतं. मी त्यांच्या चेंबरमध्ये गेलो तेव्हा मोदी गांधीजी आणि गरिबीच्या मुद्द्यावर माझ्याशी बोलले. जे मला भेटायला येतील त्यांच्या मनात किंतु परंतु नको याची काळजी मोदी घेतात. ५ दिवसांनी मला पुन्हा बोलावण्यात आले. तेव्हा मला पंतप्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असं पंतप्रधानांचे माजी मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी म्हटलं.

१९७९ च्या गुजरात मोरबी धरण फुटल्याने भयंकर पूर आला होता. त्या पूरात शहरातील इंडस्ट्री उद्ध्वस्त झाली. स्वयंसेवकांनी लोकांची मदत केली. सर्व सरकारच्या भरवशावर होते. तेव्हा मोदींनी शहरातील लोकांच्या नावाने पत्र लिहिलं. त्या पत्रात हे शहर सर्वांचे आहे आणि ते सांभाळण्याची जबाबदारीही सर्वांची आहे असं म्हटलं होते. घरोघरी हे पत्र वाटण्यात आले. त्यानंतर शहरातील युवकांनी पुढाकार घेतला आणि पुन्हा शहर सज्ज झालं अशी माहिती बॅडमिंटन प्लेअर पी व्ही सिंधुने दिली.

या वरील मान्यवरांसोबत इतरांनी मोदींशी संबंधित अशा अनेक रंजक कथाही लिहिल्या आहेत, ज्याबद्दल कोणालाच माहिती नाही. आता भाजपा हे पुस्तक घेऊन बुद्धीजीवी लोकांमध्ये जाऊन मोदींच्या कामांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहे. समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये आतापर्यंत ३५ कार्यक्रम राजस्थानमध्ये झालेत. आता नोव्हेंबरपर्यंत कॉलेज-विद्यापीठातील तरुणांमध्ये आणखी किमान २० कार्यक्रम आयोजित केले जातील.

महात्मा गांधी ज्याप्रमाणे स्वातंत्र्य चळवळीतील योगदानामुळे ओळखले जातात, त्याचप्रमाणे भाजपाने या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उभारण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानसह पुढील दोन वर्षांत होणाऱ्या निवडणुका (लोकसभा-विधानसभा) लक्षात घेऊन ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सध्या निवडणूक रॅलींना वेग येण्याआधी भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा आणि कामाचा जोरात प्रचार करत आहे. नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान असताना २० वर्षात जे मोठे काम केले आहे, ते नोव्हेंबरपर्यंत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत उपलब्ध करून देऊन वातावरण निर्माण करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सर्व कार्यक्रमांवर स्वतः लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक कार्यक्रमाचा डेटा तयार केला जात आहे. उदाहरणार्थ, किती लोक उपस्थित होते, कोण उपस्थित होते, कार्यक्रम कुठे होता, वक्ता कोण होता आणि वातावरण कसे होते? प्रत्येक कार्यक्रमासाठी एक डेटा बँक तयार केली जात आहे, ज्याचे बारकाईने निरीक्षण केले जाईल.

पहिल्या टप्प्यात देशातील चार्टर्ड अकाऊंट्स, डॉक्टर्स, वकील, माजी सैनिक, शिक्षक, व्यापारी वर्ग यांच्यासमोर केंद्रीय मंत्री आणि खासदार स्वत:चं म्हणणं ठेवतील. तर दुसऱ्या टप्प्यात कॉलेज, विद्यापीठ, केंद्रीय विद्यापीठ याठिकाणी संमेलन आयोजित करण्यात येईल. जेणेकरून तरुणांमध्ये मोदींची लोकप्रियता आणखी वाढवण्यात येईल.