Milk Price Rates Hike: महाराष्ट्रापेक्षा शेजारच्या कर्नाटकात दूध १४ रुपयांनी स्वस्त; भाजपाला कसे शक्य झाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 02:02 PM2022-08-22T14:02:25+5:302022-08-22T14:12:29+5:30

Milk Cheaper in Karnataka, Why? महाराष्ट्रात १ लीटर टोन्ड दूध आता ५२ रुपयांना मिळत आहे. अमूलने आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली होती.

महागाईचा आगडोंब उसळल्याने पेट्रोल, डिझेलसह सर्वच वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यातच गेल्या आठवड्यात अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात २ रुपये प्रति लीटर वाढ केली. यामुळे गृहीणींना आणखी मोठा फटका बसला आहे. १ लीटर टोन्ड दूध आता ५२ रुपयांना मिळत आहे. असे असताना शेजारच्या कर्नाटकात तब्बल १४ रुपयांनी स्वस्त दूध मिळत आहे.

विश्वास बसत नसेल, पण हे खरे आहे. कर्नाटकात ३७-३८ रुपयांना १ लीटर दूध मिळत आहे. अखेर, बंगळुरू आणि इतर शहरांमध्ये दुधाच्या दरात एवढी तफावत का? असा कोणता जुगाड भाजपने कर्नाटकात केला आहे जो इतर राज्यांकडे नाही? 16 ऑगस्ट रोजी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केल्याने जनतेला महागाईचा आणखी एक धक्का बसला. या दोन्ही कंपन्यांचा देशातील सर्वात मोठ्या क्षेत्रावर नियंत्रण आहे.

पण या दरवाढीचा परिणाम बंगळुरूमध्ये जाणवला नाही. कर्नाटकात मुख्यत: नंदिनी ब्रँडचे दूध सर्वाधिक वापरले जाते. हा ब्रँड कर्नाटक सहकारी दूध उत्पादक महासंघ (KMF) च्या मालकीचा आहे. दुधाचे दर न वाढण्याचे श्रेय कर्नाटक सरकारच्या योजनेला जाते. ही योजना माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी २००८ मध्ये सुरू केली होती. यानंतर सरकारे बदलली, विरोधकांची आली तरी ती योजना सुरु राहिली, याचा फायदा लोकांना होत आहे.

येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लिटरमागे २ रुपये प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. हे प्रोत्साहन दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध होते. केएमएफशी संलग्न असलेल्या डेअरी संघांना त्यांनी ज्या दराने दूध पुरवठा केला त्या खरेदी किमतीच्या वर प्रोत्साहनाची रक्कम देण्यात येते.

2013 मध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता आली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हे प्रोत्साहन वाढवून 5 रुपये प्रति लिटर केले. येडियुरप्पा पुन्हा सत्तेत आल्यावर त्यात पुन्हा वाढ झाली. ते सहा रुपये प्रतिलिटर करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत गेले आणि दूध उत्पादनही कमालीचे वाढले. केएमएफ संघांना होणारा दुधाचा पुरवठा 2007-08 मध्ये 30.35 लाख किलो प्रतिदिन होता, तो 74.80 लाख किलो प्रतिदिन वर जाऊन पोहोचला.

कर्नाटक सरकारच्या या योजनेमुळे ग्राहकांसह राज्यातील शेतकऱ्यांनाही मोठा फायदा झाला. शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधाचे सहा रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळाले. तर इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत कर्नाटकातील ग्राहकांना टोन्ड दुधावर प्रतिलिटर १४ रुपये कमी मोजावे लागत आहेत.