'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह

By विजय मुंडे  | Published: May 8, 2024 09:57 PM2024-05-08T21:57:28+5:302024-05-08T21:58:56+5:30

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

'India' alliance corrupt; BJP has leader, policy and development program ready: Amit Shah | 'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह

'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह

विजय मुंडे, जालना: एकीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार करणारी इंडिया आघाडी आहे. तर दुसरीकडे २३ वर्षांपासून एकही सुटी न घेता भारतमातेची सेवा करणारे नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यावर २५ पैशांच्या भ्रष्टाचाराचा आरोप कोणी लावू शकत नाही. आमच्याकडे नेता, नीती आणि पुढील २५ वर्षांतील देशाच्या विकासाचा कार्यक्रम तयार आहे. विरोधकांकडे ना नेता आहे, ना नीती आहे, असा हल्लाबोल भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर केला.

महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ बुधवारी रात्री जालना येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कऱ्हाड, पालकमंत्री अतुल सावे, हरिभाऊ बागडे, अजित गोपछडे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

"नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित, समृद्ध बनविले असून, जगभरात देशाचा सन्मान वाढविला आहे. काँग्रेसच्या काळात राममंदिराचा प्रश्न अनेक वर्षांपासून तसाच होता. मोदी यांनी पाच वर्षांतच केस जिंकली. भूमिपूजन केले आणि २२ जानेवारीस प्राणप्रतिष्ठापना केली. इंदिरा गांधी या गरिबी हटाओचा नारा देऊन गेल्या. कोण्या काँग्रेसी नेत्याने ते वचन पूर्ण केले नाही. परंतु, ८० कोटी जनतेचा जीवनस्तर वाढविण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल्याचेही ते म्हणाले. इंडिया आघाडीची सत्ता असताना महाराष्ट्राला केवळ १ लाख ९१ हजार कोटी रुपये दिले होते. परंतु, मोदी सरकार आले आणि फडणवीस मुख्यमंत्री बनले. १० वर्षांत मोदीजी यांनी ९ लाख ८० हजार कोटी रुपये दिले. राज्याला आणि देशाला केवळ नरेंद्र मोदी पुढे नेऊ शकतात. त्यामुळे आपण भाजपच्या, नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पाकिस्तानचा अजेंडा काँग्रेस पक्ष देशात वाढवतोय!

पाकिस्तान राहुल गांधींवर खूश आहे. मोदीजी सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक करतात. नक्षलवादी, आतंकवाद्यांना मारतात. सीएए आणतात आणि राहुल गांधी या सर्व बाबींना विरोध करतात. पाकिस्तानचा अजेंडा भारत देशात कोण वाढवत असेल तर ते राहुल गांधी यांची काँग्रेस पार्टी वाढवितेय, असा घणाघाती आरोपही अमित शाह यांनी केला. 

...तर जालन्याला सर्वच क्षेत्रांत टॉपवर नेऊ

जालन्याचे स्टील राज्याची, देशाची शान आहे. ड्रायपोर्टमुळे येथील स्टील जगभरात जाणार आहे. दोनवेळा आमदार, पाचवेळा खासदार राहून रावसाहेब दानवे यांनी जालन्याचा विकास केला आहे. आपण सहाव्यावेळा दानवे यांना खासदार केले तर ते खूप मोठे होतील. नरेंद्र मोदी जालन्याला सर्व क्षेत्रांत टॉपवर आणण्याचे काम करतील, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.

मराठवाडा दुष्काळमुक्त करू : देवेंद्र फडणवीस

या निवडणुकीत रावसाहेब दानवे सर्व रेकॉर्ड मोडून विजयी होतील. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राज्याचे चित्र बदलण्याचे काम होत आहे. समृद्धी महामार्गामुळे जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रातील उद्योगाचे मॅग्नेट होतील, असा विश्वास होता आणि तो आज खरा होताना दिसत आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पश्चिमी वाहिन्यांचे वाहून जाणारे पाणी आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करू. वॉटरग्रीड, रस्त्यांचे जाळे उभे करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यासाठी रावसाहेब दानवे आणि भाजपसोबत मतदारांनी राहावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

Web Title: 'India' alliance corrupt; BJP has leader, policy and development program ready: Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.