प्रयागराजला जात असाल तर आहात तिथेच थांबा, नाहीतर माघारी परता; पेट्रोल, डिझेल संपले, १५ फेब्रुवारीपर्यंत न येण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 11:46 IST2025-02-10T11:38:57+5:302025-02-10T11:46:20+5:30

Prayagraj Mahakumbh Traffic Jam: प्रयागराजचे संगम स्टेशनवर प्रचंड गर्दी आहे. आधीच आलेल्या भाविकांना रस्ते मार्गाने पाठविण्यात येत आहे.

महाकुंभमेळ्याला जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातच व्हीव्हीआयपींचे येणे-जाणे, झालेली चेंगराचेंगरी यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. ही एवढी वाढली की प्रयागराजपासून चारही बाजुंना सुमारे ३०० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जणूकाही संपूर्ण देशातील वाहने प्रयागराजकडेच निघाली आहेत. या पार्श्वभूमीवर १५ फेब्रुवारीपर्यंत प्रयागराजकडे न येण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रयागराजचे संगम स्टेशनवर प्रचंड गर्दी आहे. आधीच आलेल्या भाविकांना रस्ते मार्गाने पाठविण्यात येत आहे. अनेकांना तर जिल्ह्याच्या सीमेवरूनच माघारी पाठविण्यात येत आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांची तर परिस्थिती न सांगण्यासारखी झाली आहे. अनेकांच्या क्लच प्लेट खराब झाल्या आहेत. अनेकांचे इंधन संपत आले आहे. एवढेच नाही तर वाटेत असलेल्या पेट्रोल पंपांवरही इंधनाची मोठी टंचाई भासू लागली आहे.

पेट्रोल, डिझेलचे टँकर वाटेतच वाहतूक कोंडीत अडकले आहेत. यामुळे इंधनाचा पुरवठाही विस्कळीत झाला आहे. ट्रेनची तिकीटे मिळत नसल्याने लोक मिळेल त्या वाहनाने प्रयागराजला निघाले होते. यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. अनेकांनी कार तिथेच सोडून पायी जाण्यास सुरुवात केली आहे. पाच तासांच्या रस्त्याला १७ तास झाले तरी लोक पोहोचू शकलेले नाहीत.

इंजिन तापल्याने आणि एसीच्या वापरामुळे तीन गाड्यांना आग लागण्याचे प्रकारही घडले आहेत. एका घटनेत अग्निशमन दलाने गाडीच्या काचा फोडून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आहे. यात दोनजण भाजले आहेत.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र, ओडिशा, गुजरात आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना प्रयागराज-मिर्जापुर हायवेवरून करछनाच्या दिशेने वळविण्यात आले. यामुळे ही परिस्थिती ओढविली आहे. वाराणसी, जौनपुरी, कानपूर, रीवा, अयोध्या प्रतापगड आदी मार्गांवरही १०-१० किमीसाठी अख्खा दिवस वाया जात आहे.

माघी अमावास्या, पर्वच्या वेळी होणारी गर्दी ठीक होती. परंतू, सामान्य दिवसांनाही झालेली वाहतूक कोंडी भयंकर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रयागराजच्या सीमेबाहेरील गावांमध्येही काही किमीपर्यंत वाहने अडकली आहेत. गुगल मॅपवरून पर्यायी रस्ते शोधत वाहने या गावांमध्ये गेली होती. तिथेही अशीच परिस्थिती आहे.