प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला सुरुवात, त्रिवेणी संगमात पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 10:51 IST2025-01-13T10:47:38+5:302025-01-13T10:51:37+5:30

Prayagraj Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाच्या किनाऱ्यावर आज पौष पौर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. हा महाकुंभमेळा २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे. आज पौष पौर्णिमेला महाकुंभमेळ्यातील पहिल्या स्नानादिवशी सुमारे ६० लाख भाविकांनी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केलं.

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाच्या किनाऱ्यावर आज पौष पौर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. हा महाकुंभमेळा २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे. आज पौष पौर्णिमेला महाकुंभमेळ्यातील पहिल्या स्नानादिवशी सुमारे ६० लाख भाविकांनी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केलं.

हा महाकुंभमेळा एकूण ४५ दिवस चालणार आहे. त्यामध्ये शाही स्नानाच्या एकूण ६ तिथी आहेत. १३ जानेवारी २०२५ पौष पौर्णिमा, १४ जानेवारी मकर संक्रांत, २९ जानेवारी मौनी आमावस्या, ३ फेब्रुवारी वसंत पंचमी, १२ फेब्रुवारी आणि २६ फेब्रुवारी २०२५ महाशिवरात्र, या दिवशी शाही स्नान होणार आहे.

या महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे देशभरातील विविध पंथ आणि आखाड्यांचे साधू-संत गोळा झाले आहेत. तसेच या संतांनी आज त्रिवेणी संगमामध्ये पहिले शाहीस्नान केलं.

यावर्षीच्या महाकुंभमेळ्यामध्ये ११ जानेवारीपासून आजपर्यंत १ कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे. यावेळी ४० कोटीहून अधिक भाविक कुंभमेळ्यात स्नानासाठी येण्याची शक्यता आहे.

जगातील सर्वात प्राचीन आणि मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असलेल्या कुंभमेळ्याच्या कुंभ, अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि महा कुंभ अशा चार श्रेणी आहेत. कुंभचं आयोजन दर १२ वर्षांनी हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि प्रयागराज येथे होतं. तर अर्धकुंभ केवळ प्रयागराज आणि हरिद्वार येथे आयोजित होतो. या दोन्ही ठिकाणी दर सहा वर्षांनी एकदा अर्धकुंभ मेळ्याचं आयोजन होतं. पूर्ण कुंभ हा केवळ प्रयागराज येथे दर १२ वर्षांनी आयोजित होतो. तर महाकुंभ ही अत्यंत दुर्मीळ पर्वणी असून, १२ पूर्ण कुंभांनंतर म्हणजेच १४४ वर्षांनी एकदा आयोजित होतो. तसेच हा केवळ प्रयागराज येथे त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी आयोजित होतो.

महाकुंभमेळ्यादरम्यान, देशविदेशातील भाविक आमि साधूसंध पवित्र स्नानासाठी प्रयागराज येथील संगम तटावर येतात. या महाकुंभमेळ्यामध्ये स्नान करण्याचे काही नियम आहेत. सर्व प्रथम विविध आखाड्यांचे नागा साधू त्रिवेणी संगमात स्नान करतात. त्यानंतर गृहस्थ भाविक स्नान करतात. संगमामध्ये ५ वेळा स्नान केल्यानंतर शाही स्नान पूर्ण होतं अशी मान्यता आहे. या स्नानावेळी साबण किंवा शाम्पू वापरण्यास मनाई आहे. कारण यामुळे पाणी अशुद्ध होतं, असं मानलं जातं.