Mahakumbh Stampede: श्वास कोंडला, बॅरिकेट्स तुटले; गंगेच्या तिरावर मध्यरात्री काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 10:29 IST2025-01-29T10:11:19+5:302025-01-29T10:29:16+5:30

Mahakumbh Mela Stampede photos: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात बुधवारी दुर्दैवी घटना घडली, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री १.३० वाजता चेंगराचेंगरीची घटना घडली. त्याची दृश्ये हादरवून टाकणारी आहेत.

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात भाविकांचा जनसागरच लोटला आहे. देश-विदेशातून आलेल्या भाविकांमुळे गंगेचा काठ फुलून गेला आहे. भक्तीमय वातावरणाला गालबोट लावणारी वाईट घटना बुधवारी घडली.

मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराजमध्ये कोट्यवधी भाविक आले. त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी अचानक गर्दी वाढली. त्यामुळे भाविकांना गुदमरायला झालं. अनेकांचा श्वास कोंडला गेला आणि गर्दीच्या रेट्यामुळे लावण्यात आलेले बॅरिकेट्स तुटले.

बॅरिकेट्स तुटल्यामुळे अचानक लोक पळू लागले आणि यातच अनेकजण या गर्दीच्या पायदळी जाऊन मृत्यूमुखी पडले. चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू केले. ५० पेक्षा अधिक रुग्णवाहिका बोलवल्या गेल्या.

महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी आणि गोंधळामुळे अनेकजण हरवले आहेत. जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार चेंगराचेंगरीत १० भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेनंतरची त्रिवेणी संगम परिसरातील दृश्ये थरकाप उडवणारी होती. अनेकांनी सोबत आणलेले साहित्य, कपड्यांचा ढिग पडला. ज्यांनी जवळच्या माणसांना गमावले, त्यांनी हंबरडा फोडला.

अनेकजण आपल्या माणसांना गर्दीत शोधत होते. तर गर्दीत हरवलेल्यांना त्यांच्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जखमी रुग्णालयात नेण्यासाठी अधिकारी धावपळ करत होते.

ज्यांनी चेंगराचेंगरी प्राण गमावले, त्यांचे मृतदेह प्रयागराजमधील सीएमओ मेडिकल कॉलेजच्या शवागृहात नेण्यात आले. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर पवित्र स्नानासाठी येणाऱ्या भाविकांचे जत्थे जिथे आहेत, तिथे थांबवण्यात आले आहेत.

परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर भाविकांना पवित्र स्नानासाठी घाटांच्या दिशेने सोडले जाणार आहे. त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक लोक येणार नाही, याची खबरदारी आता घेतली जात आहे.

चेंगराचेंगरी झाली असली, तरी मौनी अमावस्येचा मुहूर्त साधत स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने संगमावर येत आहे. संत, महंतांकडून संगमावर स्नानासाठी न येण्याचे आवाहन केले जात आहे.

१३ जानेवारी रोजी महाकुंभ सुरू झाला आहे. तेव्हापासून २९ जानेवारीपर्यंत २० कोटी लोकांनी गंगेत पवित्र स्नान केले आहे. मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर १० कोटींपेक्षा अधिक भाविक प्रयागराजमध्ये येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.