कामगार दिन विशेष: १५ हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी केंद्र सरकाराची मोठी योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 01:30 PM2020-04-30T13:30:35+5:302020-04-30T13:37:02+5:30

केंद्र सरकारने अशा असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी प्रधानमंत्री श्रम योगी मान धन(पीएम-एसवायएम) या योजनेची सुरुवात केली. या योजनेत १८ ते ४० वयोगटातील मजूर ज्यांना महिन्याला १५ हजारांपेक्षा कमी वेतन मिळत त्या कामगारांचा समावेश होतो.

१ मे म्हणजे कामगार दिवस यासाठी आम्ही तुम्हाला सरकारने कामगारांसाठी आणलेल्या योजनांची तुम्हाला माहिती देत आहोत ज्याचा फायदा तुम्हाला घेता येईल. जगभरात असंघटित क्षेत्रातील मजुरांना सामाजिक सुरक्षा नसल्याचं दिसून येतं.

अशा मजुरांना पेन्शन, आरोग्य विमासारख्या सुविधाही उपलब्ध नसतात. केंद्र सरकारच्या माहितीनुसार भारतात ४२ कोटींहून अधिक कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. यात मजूर, श्रमिक कामगार, माथाडी कामगार, कचरा वेचणारे, रिक्षा-चालक, बांधकाम कामगार, कारखान्यातील कामगार अशांचा समावेश होतो.

कमी उत्पन्न असणाऱ्या समुहाला केंद्रीत करुन सरकारने या योजनेसाठी प्रीमियम खूप कमी ठेवला आहे. ज्यामुळे योजनेचा फायदा जास्तीत जास्त कामगारांना मिळू शकतो. या योजनेत सहभागी झाल्यानंतर ६० वर्षानंतर प्रति महिना ३ हजार रुपये पेन्शन कामगारांना मिळणार आहे.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांना आधार कार्ड, सेव्हिंग अथवा जनधन अकाऊंट आणि मोबाईल नंबरची गरज भासणार आहे. यासाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये अर्ज कारावा लागेल, त्याबाबत माहिती नसल्यास एलआयसी आणि श्रम मंत्रालयाच्या वेबसाईटवर माहिती घेता येईल.

जर कोणताही कर्मचारी १८ वर्षाचा असेल तर त्याला योजनेसाठी ६० वर्षापर्यंत प्रति महिना ५५ रुपये जमा करावे लागतील. याप्रमाणे १८ ते ४० वयोगटासाठी वेगवेगळी रक्कम निर्धारित केली आहे. जितके पैसे कामगार यामध्ये जमा करतील तितकेच पैसे सरकारकडून जमा करण्यात येतील.

जर कोणाचं वय २९ असेल तर वयाच्या ६० वर्षापर्यंत त्याला महिन्याकाठी १०० रुपये जमा करावे लागतील. जर कोणी कामगार ४० वयोगटानंतर या योजनेत सहभागी होईल तर त्याला महिन्याला २०० रुपये जमा करावे लागतील.

जर पेन्शन मिळण्याच्या कालावधीत योजनेच्या लाभार्थीचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला अथवा पतीला ५० टक्के पेन्शन देण्यात येईल. लाभार्थी या योजनेत मुलांची नावं समाविष्ट करु शकत नाहीत.

त्याचसोबत नवीन पेन्शन योजना(एनपीएस), कर्मचारी राज्य विमा प्राधिकरण, कर्मचारी भविष्यनिधी योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याशिवाय कामगार आयकर भरणाराही नसावा अशी अट आहे.

एलआयसी, कामगार कार्यालय, सीएससीच्या कार्यालयात जाऊन तुम्हाला नोंदणी करता येईल. पहिल्या महिन्यात प्रिमीयम रोख रक्कमेत घेतला जाईल त्यानंतर आपलं खातं खोलण्यात येईल. या अंतर्गत तुम्हाला श्रम योगी कार्ड मिळेल. याबाबत अधिक माहितीसाठी १८०० २६७ ६८८८ या टोल फ्री नंबर मिळेल.