तिने घडवला इतिहास! राबिया बनली काश्मीरची पहिली महिला ट्रकचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:18 IST2025-02-25T17:13:35+5:302025-02-25T17:18:58+5:30

Rabia Yasin Truck Driver: दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील ३६ वर्षीय राबिया यासीनने पहिली महिला ट्रकचालक बनून इतिहास निर्माण केला आहे.

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील राबिया यासीनने पहिली महिला ट्रकचालक बनण्याचा मान मिळवला आहे. परंपरांना आव्हान देऊन राबिया पुरुषांचे वर्चस्व असलेल्या व्यवसायात उतरली आहे. राबियाचा चालकपदाचा प्रवास वाहने चालवण्याच्या प्रेमातून सुरू झाला. चार वर्षापूर्वी मोहम्मद इम्तियाजबरोबर तिचा विवाह झाला. सुरुवातीला तिने छोटी वाहने चालवली.

पतीकडून प्रोत्साहन मिळाल्यानंतर तिने ट्रक चालवण्याचा निर्धार केला आणि त्याचा अधिकृत परवाना प्राप्त केला. तिने आजवर तामिळनाडू, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तेलंगणासारख्या राज्यांत प्रवास केलेला आहे.

राबिया तीन वर्षापासून संपूर्ण देशभरात ट्रक चालवत आहे. हा प्रवास मुळीच सोपा नाही. अनेक ठिकाणी तिला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. तिची कहाणी महिलांच्या क्षमता जगासमोर आणतानाच इतरांना प्रेरणाही देत आहे.

राबियाला कुटुंबीयांचे खंबीर पाठबळ मिळाले आहे. तिची सासू शहनाजा बेगम यांनी सांगितले की, माझ्या सुनेला ट्रक चालवायचा होता. तिची इच्छा तिने मला सांगितल्यावर आम्ही सर्वांनी तिच्या पाठीशी उभे राहायचे ठरवले. हे खरे तर वास्तवात खूप अवघड होते. परंतु, आम्ही सर्वांनी मिळून हे आव्हान पेलले आहे.

मला पूर्वीपासूनच वाहन चालवण्याचा छंद होता. पतीच्या मदतीने मी ट्रक चालवण्यास सुरुवात केली. मी ट्रक चालवतानाचे एक छायाचित्र व्हायरल झाले आणि मी देशभरातील लोकांच्या कौतुकाचा विषय ठरले, असे राबिया यासीन म्हणाली.