कडा कोसळला, ५०० मीटर खोल दरीत पडली बस, तर कार झाली भुईसपाट, समोर आले किन्नौर दुर्घटनेचे भयावह फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 11:24 AM2021-08-12T11:24:47+5:302021-08-12T11:29:18+5:30

Kinnaur landslide Update: हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथे झालेल्या भूस्खलनानंतर बचाव कार्य सुरू आहे. बससोबतच अनेक वाहने कड्यावरून कोसळलेल्या दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली आहेत. यापैकी एका सुमोमध्ये असलेल्या सर्व आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३ वर पोहोचला आहे.

हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथे झालेल्या भूस्खलनानंतर बचाव कार्य सुरू आहे. यादरम्यान, ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या बसबाबतची माहिती समोर आली आहे. ही बस रस्त्यावरून ५०० मीटर खोल दरीत सापडली आहे. या बससोबतच अनेक वाहने कड्यावरून कोसळलेल्या दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली आहेत. यापैकी एका सुमोमध्ये असलेल्या सर्व आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३ वर पोहोचला आहे.

भूस्खलनानंतर घटनास्थळावर भयावह चित्र दिसत आहे. सुमारे २०० मीटर भाग ढिगाऱ्याखाली दबला गेला आहे. घटनास्थळावर चार अँब्युलन्स, ११ गाड्या आणि मदतकार्यासाठी आवश्यक अनेक यंत्रे तैनात करण्यात आली आहेत. तसेच सुमारे १०० जणांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली गेली आहे.

किन्नौर जिल्ह्यातील चौरा आणि निगुलसरीदरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर काल दुपारी ११ वाजून ५६ मिनिटांनी कडा कोसळून ही दुर्घटना झाली होती. कोसळलेल्या दरडीमधून दगड माती मोठ्या प्रमाणात खाली आली. त्यामुळे अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

पर्वतावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात दगड माती खाली आली की, किन्नौरमधील रेकाँग पिओ येथून सिमलामधून हरिद्वार येथे जाणाऱ्या बसची माहिती अनेक तासांपर्यंत मिळत नव्हती. रात्रीच्या वेळी बचाव कार्य थांबवण्यात आले. मात्र आज सकाळी बचाव कार्य सुरू झाल्यानंतर बस दिसून आली.

कालपासून बचाव पथक ज्या बसला कालपासून शोधत होते ती बस ढिगाऱ्यामध्ये दिसून आली. ही बस रस्त्यावरून ५०० मीटर खाली आणि सतलज नदीच्या प्रवाहापासून २०० मीटर अंतरावर लटकलेली दिसून आली. या बसमध्ये किती प्रवासी प्रवास करत होते. याची माहिती अद्याप समजलेली नाही. मात्र या बसमध्ये २५ हून अधिक प्रवास होते, असे सांगण्याच येत आहे.

आयटीबीपीच्या म्हणण्यानुसार बचाव पथकाला घटनास्थळावर पोहोचण्यामध्ये खूप वेळ लागू शकतो. मात्र या घटनास्थळाचे समोर आलेले फोटो या दुर्घटनेची भयावहता समोर आणत आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे बचाव पथक बचाव कार्यामध्ये गुंतले आहे. जेसीबी मशीनच्या मदतीने ढिगारा हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २०० हून अधिक जवान मदत आणि बचाव कार्यामध्ये २०० हून अधिक जवान गुंतलेले आहेत. मात्र बचाव कार्याला सुरुवात होण्यामध्ये खूप उशीर झाला आहे, असा आरोप लोकांनी केला आहे. किन्नौर आणि सिरमौर येथे पर्वताला भेगा पडण्याच्या आणि भूस्खलन होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र किन्नौरमध्ये जेव्हा पर्वतांना भेगा पडतात तेव्हा दगड माती ऐवजी मोठमोठे खडक खाली कोसळतात.