आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 20:53 IST2025-05-15T20:46:11+5:302025-05-15T20:53:09+5:30
Kangana Ranaut Donald Trump: अभिनेत्री कंगना राणौतने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली. ट्रम्प यांच्या विधानावरून कंगनाने ट्रम्प यांना बरंच सुनावलं. पण, ही पोस्ट कंगनाला डिलीट करावी लागली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयफोनची भारतात निर्मिती करण्याबद्दल एक विधान केलं. त्यावरून अभिनेत्री कंगना राणौत ट्रम्प यांना बरंच काही सुनावलं. ट्रम्प यांच्याबद्दल हे तिचं वैयक्तिक मत होतं. पण, ती पोस्ट तिला डिलीट करावी लागली. जेपी नड्डांनी पोस्ट डिलीट करायला सांगितलं, असा खुलासा तिने केला आहे.
अभिनेत्री कंगना राणौत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भडकली आणि तिने एक पोस्ट लिहिली. ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली. या पोस्टमध्ये कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना केली होती आणि पंतप्रधान मोदी हे सर्व अल्फा पुरुषांचेही बाप आहेत, असेही म्हटले होते.
कंगना राणौतने डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, "या प्रेमभंगाचे कारण काय असू शकते? ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, पण सर्वात लोकप्रिय नेते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत."
"ट्रम्प यांचा अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ सुरू आहे, पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा कार्यकाळ आहे. यात कोणतीही शंका नाही की, ट्रम्प एक अल्फा पुरूष आहेत, पण आमचे पंतप्रधान सर्व अल्फा पुरूषांचे बाप आहेत", असे कंगनाने पोस्टमध्ये म्हटले होते.
अभिनेत्री कंगना राणौत याच पोस्टमध्ये असेही म्हणाली होती की, "ही व्यक्तिगत द्वेष आहे की, मुरब्बी राजकारणाबद्दलची असुरक्षितता?"
या पोस्टची चर्चा सुरू होती. ती कंगना राणौतने डिलीट केली. कंगनाने दुसरी पोस्ट शेअर करत सांगितले की, "राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कॉल करून मला डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कूक यांना भारतात उत्पादन न करण्याबद्दल सांगितल्याच्यासंदर्भात केलेली पोस्ट डिलीट करायला सांगितले."
"वैयक्तिक मत मांडल्याबद्दल खेद आहे. निर्देशानुसार मी ताबडतोब ही पोस्ट इन्स्टाग्रामवरूनही डिलीट केली आहे", असेही कंगना राणौत म्हणाली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कूक यांना भारतात आयफोनचे निर्मिती करू नका असे म्हटले होते. त्यावर कंगनाने ही पोस्ट केली होती.