जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी; हेलिकॉप्टरमधून उतरताच राष्ट्रपती नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 02:16 PM2021-06-27T14:16:19+5:302021-06-27T14:35:09+5:30

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी म्हणजेच जन्म देणारी माऊली आणि जन्मभूमीचा गौरव हे स्वर्गाहूनही सुंदर, महान आहे, असेही कोविंद यांनी म्हटलं.

देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकाहून कानपूरला रेल्वेने प्रवास केला.

तब्बल १५ वर्षानंतर राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती रेल्वेने प्रवास करत आहे. यापूर्वी २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी रेल्वेने प्रवास केला होता.

कानपूरमधील झिंझाक आणि कानपूर देहातच्या रुरा येथे ही ट्रेन थांबली असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले.

राष्ट्रपती कोविंद यांची जन्मभूमी असलेल्या या गावात आपल्या शालेय जीवनाच्या दिवसांमधील जुन्या परिचितांची भेट घेत आहेत. तसेच, संबंधित स्थळांनाही भेटी देत आहेत.

राष्ट्रपतींचे जन्मस्थान असलेल्या कानपूर देहातच्या परौन्ख गावाजवळ हे दोन थांबे असून तेथे त्यांच्या सन्मानार्थ आज जून कार्यक्रम होत आहेत.

राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच आपल्या जन्मस्थळी भेट देत आहेत. या ठिकाणी यापूर्वी भेट द्यायची त्यांची इच्छा होती, परंतु कोरोना महामारीमुळे ते शक्य झाले नाही.

आपल्या जन्मभूमीत हेलिकॉप्टरवरुन उतरताच राष्ट्रपतींनी जन्मभूमीला वाकून स्पर्श करत दर्शन घेतले. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत याच मातीनं देशसेवची शिकवण दिल्याचं ते म्हणाले.

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी म्हणजेच जन्म देणारी माऊली आणि जन्मभूमीचा गौरव हे स्वर्गाहूनही सुंदर, महान आहे, असेही कोविंद यांनी म्हटलं.

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी अनेकदा रेल्वे प्रवास केला होता. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी बिहार दौऱ्यादरम्यान सिवान जिल्ह्यातील त्यांचे जन्मस्थान झिरादेई येथे रेल्वेनेच भेट दिली होती.

राष्ट्रपती कोविंद यांनी परौन्खा येथील मिलन केंद्रास भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच, वीरांगणा झालकरी महावद्यालयात संबोधितही केले.

२८ जून रोजी राष्ट्रपती कानपूर स्थानकातून रेल्वेगाडीतून लखनौला दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जातील. २९ जून रोजी ते विशेष विमानाने नवी दिल्लीला परतणार आहेत.