कोरोनातही सावरलेले मग...! आयटी कर्मचारी धास्तावले; भारतीय कंपन्यांकडून कॉस्ट कटिंगची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 02:34 PM2023-01-23T14:34:41+5:302023-01-23T14:39:02+5:30

मग आयटी सेक्टर आताच का कर्मचाऱ्यांना काढतेय? भारतीयांवर कुठपर्यंत परिणाम...

गेल्या काही महिन्यांपासून जगभरात मंदीची काळी छाया पसरू लागली आहे. यातच टेक कंपन्यांमध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचारी कपात झाल्याने आयटी कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याचे काळे ढग पसरू लागले आहे. भारत हा आयटी हब आहे, यामुळे भारतातील लाखो आयटी प्रोफेशनलदेखील घाबरलेले आहेत. अशातच कंपनीचा मालक, सीईओ रातोरात मेल करून कामावरून काढून टाकल्याचे मेल करत असल्याने सर्वांच्या झोपा उडाल्या आहेत.

मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा, अमेझॉन यांनी एकाचवेळी १०-१० हजारांवर कर्मचारी काढले आहेत. या चमकत्या आयटीसेक्टरवर ही वेळ का आलीय़, भारतावर किती परिणाम होईल, किती दिवस ही मंदी चालेल याबाबत काहीच सांगता येत नाहीय.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी सुमारे 1,00,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि 2023 मध्येही हे काही थांबताना दिसत नाहीय. इंडस्ट्री जॉब ट्रॅकिंग वेबसाइट layoffs.fyi नुसार, दोन डझनहून अधिक यूएस टेक कंपन्यांनी येत्या काही महिन्यांत ते एकूण कर्मचाऱ्यांच्या १० टक्के कर्मचाऱी कपात करतील. यामुळे आता कर्मचारी कपातीचे वारे अन्य कंपन्यांमध्येही सुरु झाल्याचे हे संकेत आहेत.

जगभरातील टेक कंपन्यांमध्ये अचानक कर्मचारी कपात का होतेय याचे कारण विचारले असता, तज्ञ म्हणतात की कोविड महामारीच्या वेळी लॉकडाऊन दरम्यान टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा वातावरण अनुकूल होते. पण लॉकडाऊनचे निर्बंध संपून बाजार मोकळे होताच, या कंपन्यांची हालत खस्ता होऊ लागली आहे.

सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ यांनी जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यातच आठ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. लॉकडाऊन दरम्यान लाखो लोक घरातून काम करत होते. त्यामुळे कंपनीची तंत्रज्ञानाची मागणी वाढत होती. पण जसजसे लोक पुन्हा कार्यालयात जाऊ लागले तसतसे तंत्रज्ञानाची मागणी कमी झाली.

भारतीय टेक आणि एडटेक कंपन्यांनीही खर्चात कपात करण्यास सुरुवात केली आहे. युरोप आणि अमेरिकेत मंदीच्या भीतीने टेक कंपन्यांनी बजेटमध्ये कपात केली आहे. यामुळे भारतातील आयटी क्षेत्रातही मंदी अधिक गडद होणार आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारतीय आयटी कंपन्यांनी नवीन नोकऱ्यांसाठी 10 टक्के कमी जाहिराती दिल्या आहेत.

आतापर्यंत विप्रोने भारतातील कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. विप्रोने बिझनेस टुडेला सांगितले की त्यांना ४५२ फ्रेशर्सना काढावे लागले. प्रशिक्षणानंतरही त्यांनी वारंवार खराब कामगिरी केली होती, असे कारण दिले आहे.

आर्थिक मंदीचा भारतीय आयटी कंपन्यांवर परिणाम होईल की नाही, यावर तज्ञांनीही मत व्यक्त केले आहे. भारत देखील जागतिक अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. सर्व अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे जगात जे काही घडेल त्याचा परिणाम भारतावरही होणार हे उघड आहे. मात्र त्याचा किती परिणाम होईल हे येत्या काळात कळेल.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने भारताचे वर्णन चमकणारा तारा म्हणून केले आहे. परंतु IMF प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी काही काळापूर्वी म्हटले होते की 2023 हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी कठीण जाणार आहे.