मस्तच! अवघ्या ४० रुपयात Book करा IRCTC ची 5 स्टार रुम, रेल्वेची आता प्रवासासोबत राहण्याची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 01:32 PM2023-01-18T13:32:40+5:302023-01-18T13:38:22+5:30

IRCTC Indian Railway Facility : रेल्वेनं प्रवास करत असाल आणि तुमच्याकडे रेल्वेचं कन्फर्म तिकीट असेल तर फक्त ४० रुपयांमध्ये एका आलिशान रुममध्ये तुम्ही ४८ तास राहू शकता. भारतीय रेल्वेच्या रिटायरिंग रूममध्ये तुम्हाला लक्झरी हॉटेलच्या सर्व सुविधा मिळतात. ही सुविधा तुम्हाला बहुतांश प्रमुख स्थानकांवर मिळेल.

हिवाळ्यात अनेकदा रेल्वेगाड्या उशिराने धावतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. थंडीमुळे अनेक प्रवाशांनाही जीव गमवावा लागत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पण आता असं होणार नाही. कारण प्रवाशांची सोय लक्षात घेऊन IRCTCने ही सेवा सुरू केली आहे.

भारतीय रेल्वेनं प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा विचार करता लग्झरी रिटायरिंग रुम तयार केले आहेत. या रुमचं बुकिंग करण्यासाठी तुमच्याकडे PNR नंबर असणं गरजेचं आहे. ही सुविधा तुम्हाला रेल्वेच्या रिटायरिंग रुममध्ये मिळते. तुम्ही या रुममध्ये ४८ तासांपर्यंत आपल्या रेल्वेची वाट पाहू शकता. यासाठी तुम्हाला फक्त २० ते ४० रुपये खर्च करावे लागतात. पण सुविधा अगदी फाइव्ह स्टार हॉटेलसारखी मिळते.

नवी दिल्ली, मुंबई, पुणे यांसारख्या देशातील महत्वाच्या आणि मोठ्या रेल्वे स्थानकांवर रिटायरिंग रुमची सुविधा उपलब्ध आहे. तिकीटाच्या पीएनआर नंबरच्या सहाय्यानं तुम्ही रुम बुक करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार एसी आणि नॉन एसी रूम बुक करू शकता. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर रिटायरिंग रुमचे वाटप केले जाते. जर रिटायरिंग रुम भरल्या असतील तर तुमचे नाव वेटिंग लिस्टमध्ये टाकलं जातं आणि खोल्या रिकाम्या होताच तुमचं बुकिंग अपग्रेड केलं जातं.

रिटायरिंग रूम बुक करण्यासाठी, IRCTC च्या अधिकृत वेबसाइट irctctourism.com ला भेट द्या. होमपेजवर तुम्ही इंडियन रेल्वे रिटायरिंग रूमवर क्लिक करून रिटायरिंग रूमची सुविधा संबंधित स्टेशनवर उपलब्ध आहे की नाही हे पाहू शकता.

संबंधित स्टेशनच्या रिटायरिंग रूम बुकिंगच्या पर्यायावर क्लिक करा. तुमचा पीएनआर क्रमांक आणि आधार क्रमांक येथे नमूद करा. यानंतर Delux/AC/Non AC चा पर्याय निवडा. संपूर्ण माहितीनंतर, बुकिंग पर्यायावर क्लिक करा आणि फी भरा. तुमची बुकिंग स्वीकारली जाईल, IRCTC तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर सेवानिवृत्त खोलीचा क्रमांक आणि ठिकाणाची माहिती पाठवेल.

रेल्वे स्थानकावर ट्रेन लेट किंवा रद्द झाल्यास आता प्रवाशांना कडाक्याच्या थंडीत किंवा कडक उन्हात फलाटावर उभे राहावे लागणार नाही. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी खास सुविधा आणली आहे. आता तुम्ही फक्त ४० रुपयांमध्ये रिटायरिंग रूम बुक करू शकता.

रेल्वेच्या रिटायरिंग रूममध्ये कोणत्याही हॉटेलपेक्षा कमी सुविधा नाहीत. या रिटायरिंग रूम्स किमान ३ तास आणि जास्तीत जास्त ४८ तासांसाठी बुक केल्या जाऊ शकतात. यामध्ये एसी डिलक्स, एसी आणि नॉर्मल रूमचा पर्यायही देण्यात आला आहे. सिंगल प्रवाशांसाठी सिंगल बेडरूम आणि दोन प्रवाशांसाठी डबल बेडरूमची व्यवस्था आहे.