लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:00 IST2025-07-16T14:53:32+5:302025-07-16T15:00:09+5:30
Indigo Flight : पटना विमानतळावर एका मोठ्या हवाई दुर्घटनेचा धोका थोडक्यात टळला आहे.

पटना विमानतळावर एका मोठ्या हवाई दुर्घटनेचा धोका थोडक्यात टळला आहे. दिल्लीहून पटनाला येणाऱ्या इंडिगोच्या (IndiGo) '६ई २४८२' या विमानाला लँडिंगसाठी 'टच पॉइंट' न मिळाल्याने चक्क चार वेळा आकाशात घिरट्या घालाव्या लागल्या. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमान सुखरूप उतरले असले, तरी १७३ प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.
धावपट्टीची लहान लांबी आणि 'टचडाउन झोन'मधील अडचणींमुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीतून उड्डाण केलेले विमान '६ई २४८२' पटना विमानतळावर लँडिंग करत असताना वैमानिकाला धावपट्टीवर योग्य 'टचिंग पॉईंट' मिळाला नाही. यामुळे विमानाचे लँडिंग होऊ शकले नाही आणि वैमानिकाने ते पुन्हा वर नेले.
या दरम्यान, विमानाला आकाशात किमान चार वेळा घिरट्या घालाव्या लागल्या. त्यानंतरच वैमानिकाने विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. सूत्रांनुसार, लँडिंगच्या वेळी विमानाने निर्धारित 'टचडाउन झोन' ओलांडला होता.
विमानतळ सूत्रांनुसार, जेव्हा विमानाने लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचे मुख्य 'लँडिंग गियर' धावपट्टीला (रनवेला) टेकले खरे, पण विमान निर्धारित जागेच्या पुढे सरकले होते. कदाचित धावपट्टीची पुढील बाजू मर्यादित असल्यामुळे वैमानिकाने योग्य वेळी 'थ्रॉटल' लावून विमान पुन्हा हवेत उडवले आणि मोठी दुर्घटना टाळली.
या विमानात दिल्लीहून १७३ प्रवासी पटनाला येत होते. जेव्हा 'टच पॉइंट' न मिळाल्याने विमानाला खाली आणून पुन्हा वर नेण्यात आले, तेव्हा विमानात बसलेल्या प्रवाशांचे श्वास अक्षरशः थांबले होते. मात्र, विमानाच्या क्रू मेंबर्सनी योग्य वेळी घोषणा करून सर्व प्रवाशांना धीर दिला आणि परिस्थिती हाताळली.
दरम्यान, पटना विमानतळाची धावपट्टी लहान असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सध्या पटना विमानतळाच्या धावपट्टीची लांबी २०७२.६४ मीटर आहे, तर किमान २४३८ मीटर लांबी आवश्यक असते. याच कारणामुळे धावपट्टी वाढवण्याची तयारी सुरू आहे.
२९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे १२०० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या पटना विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले होते.