IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:31 IST2025-12-05T14:27:02+5:302025-12-05T14:31:07+5:30
IndiGo Flight Cancellations: एअरलाइन्सकडून अन्न, पाणी किंवा कोणतीही मदत न मिळाल्याने मुलांना उपाशी राहावे लागले, अशी तक्रार प्रवाशांनी केली.

Indigo Crisis: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगो एअरलाइन्सने प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. सलग चौथ्या दिवशी कंपनी गंभीर ऑपरेशनल समस्यांशी झुंजत असल्याने, आज, दिल्लीतून होणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

इंडिगोच्या फ्लाइट्स सातत्याने रद्द आणि विलंब होत असल्याने देशातील अनेक विमानतळांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमल्याचे पाहाया मिळत आहे. अचानक इतके प्रवासी जमल्यामुळे लहान मुले आणि वृद्धांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

मुंबई, दिल्ली, बंगलुरू, हैदराबाद आणि पटना विमानतळांवर प्रवाशांना रात थंडीत जागून काढावी लागली. विविध विमानतळावरील फोटो सध्या समोर आले आहेत, ज्यात कडाक्याच्या थंडीत अनेकजण जमिनीवर, तर लहान मुले बेंचवर झोपल्याचे पाहायला मिळत आहे.

इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून कर्मचारी आणि तांत्रिक समस्यांसारख्या गंभीर ऑपरेशनल अडचणींचा सामना करत आहे. याचा थेट परिणाम कंपनीच्या वेळेवर विमानसेवा देण्याच्या क्षमतेवर झाला आहे. या समस्येमुळे गुरुवारी कंपनीने एकाच दिवसात 550 उड्डाणे रद्द केली, ज्यामुळे त्यांची वेळेवर सेवा देण्याची क्षमता घसरून 19.7 टक्के इतकी नीचांकी झाली आहे.

तर, आज(5 डिसेंबर) रोजीही इंडिगो एअरलाइनला देशभरातून 600 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. रद्द होणाऱ्या विमानांची ही संख्या जास्त असल्याने, प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

अनेक पालकांनी सांगितले की फ्लाइट रद्द झाल्यानंतर त्यांच्या मुलांना उपाशीच झोपावे लागले. एअरलाइन्सकडून अन्न, पाणी किंवा कोणतीही मदत मिळाली नाही, अशी तक्रार मोठ्या प्रमाणावर करण्यात आली.

काही प्रवासी तर 15 ते 20 तासांपर्यंत अडकले होते, परंतु फ्लाइटची नवीन वेळ किंवा रिफंडबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही. वृद्ध, गर्भवती महिला आणि रुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. सध्या कंपनीकडून यावर तोडगा काढला जात आहे.

















