रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! IRCTC ने बदलले ऑनलाइन तिकीट बुकिंगचे नियम, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 10:00 AM2022-05-11T10:00:38+5:302022-05-11T10:08:45+5:30

IRCTC च्या मोबाइल अ‍ॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन तिकीट बुक करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

भारतीय रेल्वे उपक्रमाच्या IRCTC च्या संकेतस्थळावरुन रेल्वेचं तिकीट बुक करण्याच्या प्रक्रियेमध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार प्रवाशांना आता तिकीट बुक करण्याआधी आपला मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी व्हेरिफाय करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी व्हेरिफिकेशनविना कोणत्याही रेल्वे गाडीचं ऑनलाइन तिकीट बुक करता येणार नाही. IRCTC च्या म्हणण्यानुसार नवे नियम हे त्याच युझर्सला लागू होतील ज्यांनी कोरोना व्हायरस महामारीच्या सुरुवातीनंतर एकदाही रेल्वे तिकीट बुकिंग केलेलं नाही.

कसा व्हेरिफाय कराल मोबाइल आणि ई-मेल आयडी IRCTC च्या वेबसाइट किंवा अॅपवर गेल्यानंतर व्हेरिफिकेशन विंडोवर क्लिक करा. व्हेरिफिकेशन विंडोवर आल्यानंतर तिथं आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी रजिस्टर करा.

स्क्रीनवर उजव्याबाजूला व्हेरिफिकेशनचा पर्याय दिसून येईल तर डावीकडे एडिटचा पर्याय उपलब्ध असेल. जर तुम्हाला तुमच्या माहितीत कोणताही बदल करायचा असेल किंवा माहिती अपडेट करायची असेल तर एडिट पर्यायाच्या माध्यमातून तसं करू शकता. कोणताही बदल करायचा नसल्यास व्हेरिफिकेशनवर जाऊ शकता.

व्हेरिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड नंबरवर एक OTP येईल. याचा वापर करुन तुम्ही मोबाइल नंबर व्हेरिफाय करू शकता. याच पद्धतीनं ई-मेल आयडी देखील व्हेरिफाय करू शकता. तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर एक कोड येईल. ज्याचा वापर करुन तुम्ही तुमचा ई-मेल आयडी व्हेरिफाय करू शकता.

उन्हाळ्याच्या सीझनमधील सुट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून अनेक विशेष रेल्वे चालविण्यात येतात. याशिवाय ज्या रेल्वे मार्गांवर विशेष रेल्वे चालवणं शक्य नाही अशा रेल्वे मार्गांवर सध्याच्या रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डबे वाढविण्यात येतात. विशेष रेल्वे गाड्यांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या हेल्पलाइन नंबर १३९ वर कॉल करू शकता.

दरवर्षी प्रमाणे यंदाही उन्हाळ्याचा सीझन सुरू होताच रेल्वे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना कन्फर्म सीट मिळणं कठीण होऊन बसलं आहे.

सीझन म्हटलं की कन्फर्म तिकीटाचे वांदे होतात. रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पण रेल्वेकडून विशेष ट्रेन आणि डब्यांची संख्या वाढविण्यात आल्यानं याआधीच्या तुलनेत प्रवाशांना तिकीट मिळणं सुकर झालं आहे. ज्यामुळे ते आरामदायक प्रवास करू शकतात.