वंदे भारत ट्रेनचे तिकीट सर्वांत स्वस्त, ८१ मार्गांवर १६४ सेवा; पाक-चीन, जपान-फ्रान्सचा दाखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:50 IST2026-02-12T18:31:03+5:302026-02-12T18:50:29+5:30

Vande Bharat Train Ticket Fare Rate News: रेल्वेमंत्र्यांनी वातानुकूलित वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या तिकीट दरांविषयी माहिती दिली.

Vande Bharat Train Ticket Fare Rate News: सध्या चेअर कार वंदे भारत ट्रेन आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन यांना प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असले, तरी याचा १०० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

देशातील काही चेअर कार वंदे भारत ट्रेनचे कोच वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे. देशातील काही चेअर कार वंदे भारत ट्रेन २० कोचच्या केल्या जात आहेत. तर २४ कोचची स्लीपर वंदे भारत ट्रेन आणण्याची योजनाही रेल्वेकडून आखली जात आहे.

पुढील काही वर्षांत तब्बल ८०० वंदे भारत ट्रेन बांधून प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा संकल्प भारतीय रेल्वेचा आहे. तसेच एकूण २६० वंदे भारत स्लीपर ट्रेन रेक बांधण्याची योजना आहे. यातच आता वंदे भारत ट्रेनच्या तिकीट दराबाबत एक मोठी माहिती देण्यात आली आहे. वंदे भारत ट्रेनचे तिकीट स्वस्त असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

देशातील वातानुकूलित वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे भाडे इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आहे. सर्व बाबींचा विचार करूनच भाडे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली.

एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी वातानुकूलित वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या तिकीट दरांविषयी माहिती दिली. चीन, जपान आणि फ्रान्स या देशांमध्ये अशा प्रकारच्या रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. त्या देशांमध्ये अशा प्रकारच्या गाड्यांसाठी प्रतिकिमी ७ ते २० ते २० रुपये भाडे आकारणी केली जाते.

भारतात मात्र वातानुकूलित वंदे भारत एक्स्प्रेसने ३०० ते ४०० किमीचा प्रवास करणाऱ्यांकडून प्रतिकिमी २.१९ रुपये एवढे अल्प भाडे आकारले जाते, असे ते म्हणाले.

सेवांसाठी होणारा खर्च, सेवामूल्य, सेवांचा प्रकार आणि पुरविल्या जाणाऱ्या सुविधा, त्यांची उपयुक्तता, इतरांकडून असलेली स्पर्धा, सामाजिक-आर्थिक कंगोरे आदी घटकांचा विचार करून रेल्वेप्रवासाचे भाडे निश्चित केले जाते, असेही विविध प्रवासी सेवांच्या भाडे निश्चितीची माहिती देताना त्यांनी सांगितले.

वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन देशात फेब्रुवारी, २०१९ पासून सुरू झाल्या असून आत्तापर्यंत देशभरात ८१ मार्गांवर १६४ वंदे भारत गाड्या धावत आहेत, असे सांगतानाच 'या गाड्यांच्या सेवांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

कवच प्रणाली या गाड्यांमध्ये बसविण्यात आली आहे. प्रवाशांना परवडतील अशा प्रकारे या गाड्यांच्या भाड्याची रचना करण्यात आली आहे. वंदे भारत गाड्यांना प्रवाशांकडून मोठी मागणी आहे. त्याचा विचार करूनच भाडे इतर देशांच्या तुलनेत कमी ठेवण्यात आले आहे', असे वैष्णव म्हणाले.

सामान्य श्रेणीच्या रेल्वेप्प्रवासासाठी अन्य देशांच्या तुलनेत भारतात कमी भाडे द्यावे लागते, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

भारतात प्रतिकिमी २० पैसे भाडे आकारले जात असताना पाकिस्तानात हेच दर प्रतिकिमी ५४ पैसे, बांगलादेशात ३७ पैसे तर श्रीलंकेत ५१ पैसे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, प्रवाशांनी कन्फर्म आणि तत्काळ तिकिटे रद्द केल्यावर रेल्वेला मिळणारे उत्पन्न वेगळे ठेवले जात नाही.