60 वर्षांत 400 अपघात, 200 जवान आणि 60 नागरिकांचा मृत्यू; MIG 21 चा आणखी एक अपघात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 01:38 PM2023-05-08T13:38:40+5:302023-05-08T13:41:58+5:30

1960 मध्ये भारतीय वायुसेनेत दाखल झालेल्या मिग-21 विमानांनी 1971 च्या युद्धात मोठी भूमिका बजावली होती.

Indian Air Force Mig 21: 1971 च्या युद्धात MIG 21 विमानाने पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकयला भाग पाडले. MIG 21 हे लढाऊ विमान 6 दशकांपासून भारतीय हवाई दलाचा कणा मानले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या विमानाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण म्हणजे, या विमानाच्या अपघाताच्या घटना. आज राजस्थानमधील हनुमानगडमध्ये Mig 21 विमान क्रॅश झाले. विमान एका घरावर कोसळल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

विशेष म्हणजे, MIG-21 ला अपघातांचा मोठा इतिहास आहे. एअरफोर्सचे हे विमान 60 वर्षांत 400 वेळा क्रॅश झाले. या अपघातांमध्ये सुमारे 200 जवान शहीद झाले, तर 60 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यामुळेच याला 'फ्लाइंग कॉफिन' असेही म्हणतात.

1960 च्या दशकात सामील झाले- मिग-21 विमानांचा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला समावेश करण्यात आला होता. मिग-21 ला भारतातील सर्वात जास्त काळ सेवा देणारे लढाऊ विमान देखील म्हटले जाते. 1963 मध्ये भारताला रशियाकडून पहिले सिंगल इंजिन मिग-21 मिळाले. तेव्हापासून भारतीय हवाई दलाची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी या लढाऊ विमानाच्या 874 व्हेरिएंटचा समावेश करण्यात आला आहे.

200 जवान शहीद झाले- मिग 21 विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने भारतात बनवले आहे. मात्र, मेड-इन-इंडिया मिग-21 विमानांपैकी निम्मी विमाने कोसळली आहेत. या अपघातांमध्ये 200 पायलट शहीद झाले आहेत. 2000 मध्ये, मिग-21 नवीन सेन्सर्स आणि शस्त्रांसह अपग्रेड करण्यात आले. या मिग-21 विमानातून विंग कमांडर अभिनंदन यांनी बालाकोट हवाई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी 2019 मध्ये पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान पाडले होते.

मिग 21 निवृत्त होत आहे- भारतीय हवाई दल दीर्घकाळापासून मिग 21 चा वापर करत आहे. परंतु नवीन लढाऊ विमाने दाखल होण्यास उशीर झाल्यामुळे हवाई दलाला अजूनही त्यांचा वापर करावा लागत आहे. पण, भारतीय हवाई दलाच्या अपघातांच्या अलीकडच्या घटना पाहता, हवाई दल आपल्या ताफ्यातून हे विमान काढून टाकणार आहे. वायुसेनेने गेल्या वर्षी 30 सप्टेंबरपर्यंत मिग 21 बायसनचे स्क्वाड्रन हटवले होते. 2025 पर्यंत मिग 21 चे उर्वरित तीन स्क्वॉड्रन टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्याची योजना आहे.

राजस्थानमध्ये अपघात झाला- राजस्थानमधील हनुमानगडमध्ये सोमवारी हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले आणि निवासी भागात पडले. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. मात्र, दोन्ही पायलट स्वत:ला बाहेर काढण्यात यशस्वी झाले. हनुमानगडचे एसपी सुधीर चौधरी यांनी सांगितले की, विमानाने सुरतगडहून उड्डाण केले होते. बहलोलनगर येथे अपघात झाला. याआधी जुलै 2022 मध्ये राजस्थानच्या बारमेरजवळ प्रशिक्षणादरम्यान मिग-21 विमान कोसळले होते. या अपघातात भारतीय हवाई दलाचे (IAF) दोन वैमानिक शहीद झाले होते.