भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 01:29 IST2025-04-26T01:03:44+5:302025-04-26T01:29:31+5:30

भारताने सिंधू पाणी करार स्थगित करून पाकिस्तानवर कठोर कारवाई केली आहे. यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते बिथरले आहेत...

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. यातच आता, भारताने पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओकेचा ताबा घावा आणि तेथील दहशतवाद समूळ नष्ट करावा, अशी मागणी पीओकेतूनच होऊ लागली आहे.

दरम्यान, भारताने सिंधू पाणी करार स्थगित करून पाकिस्तानवर कठोर कारवाई केली आहे. यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते बिथरले आहेत. पाकिस्तानी संसदेचे वरिष्ठ सभागृह सिनेटने शुक्रवारी भारताचे आरोप फेटाळून लावणारा ठरावही मंजूर केला आहे. मात्र, आता तेथील लोकच शाहबाज सरकारला लक्ष्य करत आहेत.

खरे तर, पीओकेचे राजकीय कार्यकर्ते अमजद अय्युब मिर्झा म्हणाले, "पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांसह काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला केला आहे. काश्मीरची प्रगती पाहून पाकिस्तानी राज्यकर्ते अस्वस्थ होत होते, असा आरोपही त्यांनी केला. त्याच काश्मीरच्या दुसऱ्या बाजूला शांतता असल्याचे त्यांना बघवत नव्हते.

तेथे (जम्मू-काश्मीर) रस्ते बांधले जात आहेत, पूल बांधले जात आहेत. तेथील अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. लडाखमध्येही विकास होत आहे. हे सर्व त्यांना पचवत नव्हते.

पाकिस्तानला काश्मीरची प्रगती बघवत नव्हती - मिर्झा म्हणाले, काश्मीर प्रगती करत आहे, मात्र पीओकेमध्ये गरिबी आहे. येथील लोकांना १४-१४ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. यामुळे इथे प्रचंड असंतोष आहे. लोक आपल्या मुलांसह आत्महत्या करण्याची धमकी देत ​​आहेत. म्हणूनच पाकिस्तानी मालकांनी काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला केला. आता भारताने पीओके आणि पीओजेके दोन्ही आपल्या ताब्यात घेण्याची वेळ आली आहे. या आजारावर हा कायमचा इलाज असेल."

…तर भारत केव्हाही पीओकेमध्ये शिरू शकतो - भारत सरकारच्या कारवाईला प्रत्युत्तर देत, शिमला करार रद्द करण्या पाकिस्तानच्या कारवाईवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, असे करून पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. कारण याचा अर्थ आता नियंत्रण रेषा (एलओसी) संपली आहे आणि पाकिस्तान पुन्हा युद्धबंदी रेषेवर आला आहे. याचा अर्थ असा की, आता भारत जेव्हा इच्छा असेल, तेव्हा पीओकेमध्ये प्रवेश करू शकतो.