तीन वर्षांनंतर पुन्हा कोरोनाचं टेन्शन! १४६ दिवसांनंतर सर्वाधिक रुग्ण, 'या' ८ गोष्टींची घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 06:24 PM2023-03-25T18:24:37+5:302023-03-25T18:29:25+5:30

देशात तीन वर्षांनंतर आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण देशात रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे आणि सक्रिय रुग्णांचाही आकडा वाढत आहे.

दैनंदिन पॉझिटीव्ह रुग्णांचं प्रमाणही वाढत असून ते १.३३ टक्के इतकं झालं आहे. गेल्या २४ तासांत देशात १,५९० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या गेल्या १४६ दिवसांमधली सर्वाधिक आहे.

भारतात आता कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ८६०१ इतकी झाली आहे. यातच आरोग्य मंत्रालय आता अलर्ट मोडवर आहे. मंत्रालयानं कोरोनाबाबतीत एक संयुक्त अॅडव्हायझरी जारी केली आहे. यात व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच नागरिकांना हात स्वच्छ धुणं आणि श्वसनासंदर्भातील कोणतीही अडचण असल्यास जागरुक राहण्यास सांगण्यात आलं आहे.

विशेषत: सर्वात आधी आजारी आणि वयोवृद्ध नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी किंवा खराब वातावरणाच्या ठिकाणी नेणं टाळावं. आरोग्य सेवेशी निगडीत डॉक्टर्स, पॅरामेडिक्स आणि इतर कर्मचाऱ्यांसोबतच रुग्ण आणि नातेवाईकांनी मास्कचा वापर करावा.

गर्दीच्या आणि बंद जागेच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. शिंकताना किंवा खोकताना नाक तसेच तोंड झाकण्यासाठी रुमाल, टिश्यूचा वापर करावा. हातांची स्वच्छता बाळगावी आणि वारंवार हात धुणं कधीची चांगलं. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. चाचण्यांवर भर दिला जावा आणि लक्षणं आढळताच तातडीनं चाचणी करुन घ्यावी. श्वासनासंदर्भातील आजार असल्यास काळजी घ्यावी आणि इतरांची भेट घेणं टाळावं.

रुग्णालयातील औषधं, बेड, आयसीयू बेडसह अनेक गोष्टींसह सज्ज रहावं अशा सूचना आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत. तसंच रुग्णालयातील तयारींचा आढावा घेणं देखील महत्वाचं असल्याचं म्हटलं आहे. चिकित्सा उपकरणं, ऑक्सिजन, लसीकरणाची स्थिती तसंच कर्मचाऱ्यांची उपलब्धता यावर भर देण्यास सांगण्यात आलं आहे.

१० आणि ११ एप्रिल रोजी देशभरात मॉकड्रील करण्याची योजना आखली जात आहे. यात सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधांशी निगडीत लोक सहभाग घेणार आहेत. याआधी २७ मार्च रोजी एक व्हर्च्युअल बैठक घेतली जाणार आहे. यात मॉक ड्रीलबाबत सर्व राज्यांना माहिती दिली जाणार आहे.

दिल्लीत शुक्रवारी कोरोचे नवे १५२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याठिकाणी संक्रमणाचा दर ६.६६ टक्के इतका झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार गुरुवारी पॉझिटिव्हीटी रेट ४.९५ टक्के इतका होता आणि ११७ नवे रुग्ण दाखल झाले होते. याआधी दिल्लीत गेल्या ऑक्टोबरमध्ये दैनंदिन पातळीवर कोरोना रुग्णांचा आकडा तीन अंकी होता. देशात H3N2 इन्फ्लूएंजामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे.