भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:26 IST2025-06-17T12:06:57+5:302025-06-17T12:26:53+5:30
जगातील अनेक देशांकडे अण्वस्त्रे आहेत. यामध्ये रशिया आणि अमेरिकेचा नंबर वरती लागतो.

जगात अण्वस्त्रांची स्पर्धा वाढत आहे. SIPRI म्हणजेच स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अलीकडील अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. या स्पर्धेत अजूनही फक्त ९ देश सहभागी आहेत आणि त्या सर्वांनी जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान अण्वस्त्र आघाडीवर स्वतःला बळकट केले आहे. फक्त रशिया आणि अमेरिकेकडे जगातील सुमारे ९० टक्के अण्वस्त्रे आहेत.
अमेरिका आणि रशिया व्यतिरिक्त, यादीमध्ये ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्रायलचा समावेश आहे. अहवालानुसार, जगात एकूण १२ हजार २४१ अण्वस्त्रे होती, त्यापैकी ९ हजार ६१४ लष्करी साठ्यात होती. सुमारे ३ हजार ९१२ अण्वस्त्रे क्षेपणास्त्रे आणि विमानांसह तैनात आहेत.
अमेरिकेकडे एकूण ५१७७ अण्वस्त्रे आहेत, त्यापैकी १४७७ रिटायर्ड वॉरहेड्स आहेत. ३७०० लष्करी साठ्यात आहेत. त्यापैकी १७७० तैनात आहेत आणि १९३० साठवून ठेवल्या आहेत.
रशियाकडे एकूण ५४५९ अण्वस्त्रे आहेत, त्यापैकी ४३०९ लष्करी साठ्यात आहेत. १७१८ वॉरहेड्स तैनात आहेत आणि २५९१ साठवून ठेवले आहेत. रशियाने ११५० वॉरहेड्स रिटायर्ड केले आहेत.
ब्रिटनकडे १२० तैनात केलेले वॉरहेड्स आहेत आणि १०५ साठवणुकीत आहेत. त्यांच्या लष्करी साठ्यात २२५ शस्त्रे आहेत. ब्रिटनकडे एकूण २२५ शस्त्रे आहेत.
फ्रान्सकडे एकूण २९० अण्वस्त्रे आहेत. त्यापैकी २८० तैनात आणि १० साठवून ठेवली आहेत.
चीनकडे सुमारे ६०० अण्वस्त्रे आहेत. त्यांच्याकडे २४ तैनात केलेले वॉरहेड आहेत आणि ५७६ साठवणुकीत आहेत.
भारत या यादीत सहाव्या स्थानावर आहे. भारताकडे एकूण १८० अण्वस्त्रे आहेत आणि ती सर्व साठवणुकीत आहेत.
पाकिस्तानकडे १७०, उत्तर कोरियाकडे ५० आणि इस्रायलकडे ९० अण्वस्त्रे आहेत, जी सर्व या देशांमध्ये लष्करी साठ्यात आहेत.
SIPRI चा अंदाज आहे की, चीनकडे किमान 600 अण्वस्त्रे आहेत. अहवालानुसार, चीनने इतर कोणत्याही देशांपेक्षा वेगाने अण्वस्त्रांचा साठा वाढवला आहे. निरीक्षकांच्या मते, चीनच्या वाढत्या अण्वस्त्रांच्या साठ्याचा भारतावरही परिणाम होईल, कारण बीजिंगचा जवळचा मित्र पाकिस्तान देखील आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाला गती देत आहे.