India-China: हिंद महासागरात वेगाने पसरतोय ड्रॅगन; येणाऱ्या काळात भारतासाठी मोठं टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 04:23 PM2020-06-13T16:23:29+5:302020-06-13T16:26:55+5:30

भारत आणि चीनमध्ये लडाख सीमेवरील तणाव आता शिगेला आहे. दोन्ही देशांचे हजारो सैनिक आमनेसामने आहेत. भारत आणि चीन यांच्यात सुसंवाद सुरु असला तरी तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

दरम्यान काही तज्ञांनी असा इशारा दिला आहे की, चिनी ड्रॅगन हिंद महासागरात फारच वेगाने आपले हातपाय पसरवत आहे आणि त्यामुळे येत्या काळात भारताला लडाखपेक्षा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

थिंक टँक ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या अहवालानुसार लडाखमधील नियंत्रण रेषा ही भारतासाठी चिंता नाही चीन हिंदी महासागरामध्ये जलदगतीने आपला हातपाय पसरवत आहे. या वर्षाच्या मेमध्ये घेण्यात आलेल्या सॅटेलाइट फोटोंवरुन हे स्पष्ट होत आहे.

आफ्रिकेच्या जिबूती येथील चिनी नौदल तळाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. पूर्वी लॉजिस्टिक सपोर्टद्वारे बांधलेला हा बेस आता नौदल तळात रुपांतरित झाला आहे. चिनी विमानवाहू जहाजही या तळावर उभे राहू शकते.

मालदीवमध्ये कृत्रिम बेट विकसित करण्यात चीनचा देखील सहभाग आहे. अनेकांचा असा दावा आहे की, हिंद महासागरातील भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी चीन हे बेट विकसित करत आहे.

चीनने पाकिस्तानमधील ग्वादर बंदरात नौदल तळ बांधल्याचीही बातमी आहे. चीन बांगलादेशच्या कॉक्स बाजारमध्ये नौदल तळ विकसित करण्यास मदत करत आहे.

जिबूती मधील चीनचा नौदल तळ हिंद महासागरातील ड्रॅगनच्या महत्वाकांक्षा प्रतिबिंबित करतो. हा नेव्हल बेस सुमारे २५ हजार चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. हा अड्डा स्वतःच चिनी किल्ल्यासारखा आहे. यात सुमारे १० हजार चिनी सैनिक राहू शकतात.

विश्लेषकांचे मत आहे की, या तळाच्या माध्यमातून चीन या भागातील बारीक हालचालींवर नजर ठेवतो. आजूबाजूला पाळत ठेवण्यासाठी वॉच टॉवर्स बांधण्यात आले असून सुरक्षा व्यवस्थेचा जोरदार बंदोबस्त करण्यात आला आहे.

सुमारे दशकांपूर्वी चिनी नौदलाने समुद्री चाच्यांपासून बचावच्या नावाखाली हिंद महासागरात पाऊल ठेवले. चीन आपले हित आणि व्यापार संरक्षित करण्यासाठी हे करीत आहे असं विश्लेषकांना वाटत होते परंतु त्यांची मते बदलली.

चीन आता हिंद महासागरातील एक प्रमुख शक्ती म्हणून स्वत: ला पुढे आणत आहे. चीन हिंद महासागरात सतत पाणबुडी आणि युद्धनौका पाठवत आहे असं विश्लेषक सांगतात, मागील सप्टेंबर महिन्यात भारतीय हद्दीत चीनचं जहाज घुसलं होतं. भारतानं पश्चिमी प्रशांत महासागरात आपली ताकद वाढवावी ज्याठिकाणी चीनचा दबदबा आहे.