रतन टाटांच्या भेटीला येताहेत दोन पाहुणे; नोकरी सोडून पायी निघाले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 10:50 PM2021-09-17T22:50:58+5:302021-09-17T22:55:18+5:30

रतन टाटांच्या भेटीसाठी मध्य प्रदेशहून मुंबईला निघालं दाम्पत्य

उद्योगपती रतन टाटांच्या चांगल्या कामांचा प्रभाव अनेकांवर आहे. रतन टाटांना आदर्श मानणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. रतन टाटांचं देशप्रेम, व्यवसाय वाढीकडे लक्ष देत असताना ते जपत असलेली मूल्यं, करत असलेली समाजसेवा याबद्दल सगळ्यांनाच आदर आहे.

यशस्वी उद्योगपती असलेले रतन टाटा माणूस म्हणून कसे आहेत याचाही प्रत्यय अनेकदा आला आहे. काही महिन्यांपूर्वीच रतन टाटा पुण्याला गेले होते. माजी कर्मचारी आजारी असल्याचं त्यांना समजलं आणि टाटा त्याच्या भेटीसाठी पुण्याला गेले.

रतन टाटांनी आतापर्यंत अनेकदा मनाचा मोठेपणा दाखवला आहे. रतन टाटांचे हेच गुण एका दाम्पत्याला भावले आणि ते दाम्पत्य सगळं काही सोडून रतन टाटांच्या भेटीसाठी पायी निघालं. रात्री मिळेल तिथे आश्रय घेत दाम्पत्य दिवसा पायी वाटचाल करत आहे.

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातल्या मैहरमधील लटा गावात वास्तव्यास असलेले राहुल पटेल आणि सुलोचना सिंह टाटांच्या भेटीसाठी पायी निघाले आहेत. २९ ऑगस्टला ते घरातून निघाले. तिरंगा आणि रतन टाटांचा फोटो घेऊन दोघे मुंबईच्या दिशेन चालत आहेत.

राहुल पटेल आणि सुलोचना सिंह या दोघांनी नोकरी सोडली आहे. राहुल पेशानं मॅकेनिकल इंजिनीयर आहेत. तर सुलोचना फॅशन डिझायनर आहेत. दोघेही दररोज ३० किमी चालत आहेत.

रतन टाटांनी देशहितासाठी केलेल्या कामांमुळे प्रभावित झाल्यानं राहुल आणि सुलोचना यांनी त्यांच्या भेटीसाठी पायी निघण्याचा निर्णय घेतला. रतन टाटांची भेट हेच आता दोघांच्या आयुष्याचं ध्येय आहे.

रतन टाटांच्या भेटीसाठी राहुल आणि सुलोचना यांनी नोकरी सोडली. रात्री एखाद्या गावात किंवा शहरात मुक्काम करून दोघे पुन्हा सकाळी मुंबईच्या दिशेनं निघतात.

Read in English