सरन्यायाधीशांची निवड कशी होते, CJI ला महिन्याला किती मिळतो पगार?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 05:36 PM2022-11-09T17:36:36+5:302022-11-09T17:40:58+5:30

न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. यामध्ये कलम ३७०, गोपनीयतेचा अधिकार आणि अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित निर्णयांचा समावेश आहे.

CJI डी वाय चंद्रचूड यांचे वडील दिवंगत वाय वी चंद्रचूड हे देखील सरन्यायाधीश राहिले आहेत. त्यांचे वडील २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ पर्यंत सरन्यायाधीश होते. सर्वाधिक काळ हे पद भूषवणारे त्यांचे वडील पहिले सरन्यायाधीश आहेत. पिता-पुत्र दोघेही या पदावर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सरन्यायाधीशांची निवड कशी होते हे समजून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कसे बनवले जातात हे जाणून घेणे आवश्यक आहे. कॉलेजियम सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस करते. कॉलेजियममध्ये फक्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात. हे कॉलेजियम न्यायाधीशांसाठीचे नाव केंद्र सरकारकडे पाठवते. केंद्राचं शिक्कामोर्तब मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते.

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश ज्या दिवशी शपथ घेतात, त्या दिवशी ते सरन्यायाधीश होणार की नाही हे ठरविले जाते. कधी कधी एकाच दिवशी शपथ घेणारे दोनच न्यायाधीश वरिष्ठ आणि कनिष्ठ होतात. दोन-तीन मिनिटांचीच गोष्ट आहे. उदाहरणार्थ, न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी सर्वोच्च न्यायालयात एकाच दिवशी शपथ घेतली. पण आधी शपथ घेतल्याने न्यायमूर्ती दीपक मिश्रा ज्येष्ठ होऊन सरन्यायाधीश झाले.

मात्र, एकाच दिवशी अनेक न्यायाधीशांनी शपथ घेतली, तर कोणते न्यायाधीश कोणत्या क्रमाने शपथ घेतील, हेही ज्येष्ठतेच्या आदेशावरून ठरते. सध्या सरन्यायाधीशपदावर येणाऱ्या न्यायाधीशांचे शेड्युल्ड २०२७ पर्यंत निश्चित करण्यात आले आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड हे ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ म्हणजेच पूर्ण दोन वर्षांसाठी सरन्यायाधीश असतील.

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती व त्यांच्या न्यायाधीशांच्या वेतनात जानेवारी २०१६ मध्ये शेवटची सुधारणा करण्यात आली होती. न्याय विभागाच्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य सरन्यायाधीशाचे वेतन २.८० लाख रुपये आणि त्यांच्या न्यायाधीशांचे वेतन आहे २.५० लाख रुपये प्रति महिना आहे.

निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांना १६.८० लाख रुपये आणि न्यायाधीशांना १५ लाख रुपये वार्षिक पेन्शन मिळते. यासोबतच २० लाख रुपयांची ग्रॅच्युइटीही दिली जाते. त्याच वेळी, सर्व राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना २.५० लाख रुपये आणि न्यायाधीशांना २.२५ लाख रुपये दरमहा वेतन मिळते. निवृत्तीनंतर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना १५ लाख रुपये आणि न्यायाधीशांना १३.५० लाख रुपये वार्षिक पेन्शन मिळते.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे वय ६३ वर्षे आहे. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून कायद्याची पदवी मिळवली. दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूलमधून एलएलएम केले आणि नंतर ज्युरीडिकल सायन्सेसमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली.

भारतात परतल्यानंतर त्यांनी कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली. जून १९९८ मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाचा दर्जा मिळाला. त्याच वर्षी त्यांना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल बनवण्यात आले. २९ मार्च २००० रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.

यानंतर त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली, न्यायमूर्ती चंद्रचूड ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. २०१६ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.