'या' राज्यात 1088 अत्याधुनिक रुग्णवाहिका सुरू; अवघ्या काही मिनिटांत लोकांपर्यंत पोहोचतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 06:31 PM2020-07-02T18:31:21+5:302020-07-02T18:40:10+5:30

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे.

यातच आंध्र प्रदेश सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे, जेणेकरून कोरोना अथवा इतर रुग्णांना त्वरित उपचार मिळावा, यासाठी रुग्णवाहिकांची अत्याधुनिक सेवा वाढविली आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी राज्याच्या आरोग्य सेवेत वापरल्या जाणार्‍या 108 आणि 104 रुग्णवाहिका सेवा सुरू केल्या आहेत. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची आधुनिक रुग्णवाहिका सेवा वापरली जाणार आहे.

बुधवारी मुख्यमंत्र्यांनी विजयवाड्याच्या बेंझ सर्कलमध्ये 1,088 (104 आणि 108) रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखविला.

सर्व रुग्णवाहिका आधुनिक तांत्रिक सुविधा आणि औषधांनी सुसज्ज आहेत. या रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, इन्फ्यूजन पाईप्स, स्ट्रेचर्स इत्यादी सुविधा असणार आहेत.

मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी म्हणाले की, या रुग्णवाहिका शहरात 15 मिनिटांत, ग्रामीण भागात 20 आणि एजन्सी भागात 25 मिनिटांत उपलब्ध होतील. याव्यतिरिक्त, या रुग्णवाहिकांमध्ये रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार केले जाईल.

बेंझ सर्कल ते राघवैया पार्क दरम्यान 1088 रुग्णवाहिका पार्क करण्यासाठी चार लाइन्स तयार करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी या रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखविल्यानंतर त्या स्टेजसमोरून जात 31 जिल्हे आणि प्रभागांसाठी रवाना झाल्या. या कार्यक्रमासाठी रोड मॅप यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता.

आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेल्या या विशेष रुग्णवाहिकेविषयी माहिती देताना डॉ, मल्लिकार्जुन म्हणाले की, 108 क्रमांकाची 412 आणि 104 क्रमांकाची 282 रुग्णवाहिकेत लाइफ सपोर्ट सिस्टम आहेत. या व्यतिरिक्त 26 निओ नेटल केअर रुग्णवाहिका (नवजात मुलांच्या उपचारांशी संबंधित) आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, सेवा निश्चित वेळेत ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केली आहे. आपत्कालीन कॉल प्राप्त होण्याच्या वेळेपासून या आपत्कालीन वाहनांच्या घटनास्थळी पोहोचण्याचा अंदाज शहरी भागात 15 मिनिटांचा, ग्रामीण भागात 20 मिनिटांचा आणि एजन्सीमध्ये 25 मिनिटांचा असतो.