Gujarat Flood: गुजरातमध्ये परिस्थिती बिघडली; ६१ जणांचा मृत्यू, २७२ जनावरे दगावली, पाहा रौद्ररुप फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 07:07 PM2022-07-11T19:07:51+5:302022-07-11T19:18:41+5:30

Gujarat Flood: गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुजरातमधील परिस्थिती गंभीर बनली आहे.

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे परिस्थिती बिघडली आहे. दक्षिण गुजरातमधील डांग, नवसारी आणि वलसाड जिल्ह्यात येत्या पाच दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुजरातमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. छोटा उदयपूर आणि नर्मदा जिल्ह्यांत नद्यांना उधाण आले आहे.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी कार्यरत आहे. विस्थापितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गुजरातमध्ये पावसाळ्यात आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे २७२ जनावरे दगावल्याची माहिती समोर येत आहे.

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. छोटा उदयपूर, वलसाड आणि नवसारी येथे अनेकांनी स्थलांतर केले आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि अनेक पंचायतींच्या मालकीचे रस्ते बंद झाले आहेत.

दक्षिण आणि मध्य गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. १५०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

छोटा उदयपूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे पुलाचा काही भाग कोसळला. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, छोटा उदयपूरमधील बोदेली तालुक्यात रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अवघ्या १२ तासांत ४३३ मिमी पाऊस झाला, त्यामुळे सखल भागात पूर आला आहे.

दरम्यान, गुजरातमधील पुरामुळे बिघडलेली परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर चर्चा केली.

गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले की, पंतप्रधान मोदींनी राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्री पटेल यांनी पंतप्रधान मोदींना गेल्या ४८ तासांतील राज्यातील परिस्थितीची माहिती दिली.