Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 17:25 IST2025-05-12T17:15:03+5:302025-05-12T17:25:42+5:30
Who is Vikram Misri: काश्मीरमध्ये जन्म... जाहिरात आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये नोकरी... त्यानंतर थेट तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव... ही कहाणी आहे, मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विक्रम मिस्री यांची! शस्त्रसंधीची घोषणा केल्यामुळे ट्रोलर्संचा सामना कराव्या लागलेल्या मिस्रीबद्दल जाणून घ्या...

भारत-पाकिस्तान यांच्या शस्त्रसंधी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाबद्दल माहिती देणारे परराष्ट सचिव विक्रम मिस्री यांचे एक्स सोशल मीडिया अकाऊंट प्रोटेक्टेड मोडवर दिसले. शस्त्रसंधीनंतर त्यांना आणि त्यांच्या मुलीला प्रचंड ट्रोल केलं जातंय.
विक्रम मिस्री हे मूळचे काश्मिरी. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९६४ रोजी श्रीनगरमध्ये झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण श्रीनगर आणि उधमपूरमध्ये झाले. शालेय शिक्षणानंतर ते ग्वालियरच्या सिंधिया स्कूलमध्ये आले.
ग्वालियरमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली गाठली. दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून इतिहासात पदवी घेतली. त्यानंतर विक्रम मिस्री यांनी जमशेदपूर येथील एक्सएलआरआय संस्थेतून एमबीएची पदवी घेतली. सनदी सेवेत येण्यापूर्वी त्यांनी जाहिरात आणि अॅड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, विक्रम मिस्री हे भारतीय विदेश सेवेच्या १९८९ च्या बॅचचे अधिकारी आहेत.
परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले. यात त्यांनी युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेत वेगवेगळ्या दूतावासात अधिकारी म्हणून सेवा बजावली.
विक्रम मिस्री यांनी परराष्ट्र मंत्रालयात पाकिस्तान डेस्कवरही काम केले आहे. त्याचबरोबर ते इंद्र कुमार गुजराल आणि प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री असताना त्यांच्या टीममध्येही होते.
विक्रम मिस्री यांनी ब्रसेल्स, ट्यूनिस, इस्लामाबाद आणि वॉशिंग्टन डीसीमध्येही काम केले आहे. ते श्रीलंकेत भारताचे उप उच्चायुक्त आणि म्यूनिखमध्ये भारताचे कन्सूल जनरल होते.
विक्रम मिस्री यांना पंतप्रधान कार्यालयात करण्याचाही अनुभव आहे. ते पंतप्रधान कार्यालयाचे संयुक्त सचिव म्हणून सेवेत होते. मिस्री यांनी भारताच्या तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून काम केले आहे.
विक्रम मिस्री माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल, डॉ. मनमोहन सिंग आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव होते. १५ जुलै २०२४ रोजी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता.
विक्रम मिस्री यांनी उच्चायुक्त म्हणून २०१४ मध्ये स्पेन, २०१६ मध्ये म्यानमार आणि २०१९ मध्ये चीनमध्ये सेवा केली. मिस्री यांनी भारताचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून २०२२ ते २०२४ पर्यंत काम पाहिले आहे. त्यांना हिंदी, इंग्रजी आणि काश्मिरी भाषा येतात. फ्रेंच भाषेचेही त्यांना चांगले ज्ञान आहे. त्यांच्या पत्नीचे नाव डॉली आहे. त्यांना दोन मुलं आहेत.