Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 08:57 AM2020-02-26T08:57:55+5:302020-02-26T09:15:26+5:30

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू झालेल्या हिंसाचाराने उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये हिंसक रूप धारण केले आहे. सोमवारी उसळेल्या हिंसाचारापासून आतापर्यंत एका पोलिसासह एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, गोकुलपुरी, जौहरी एन्क्लेव्ह आणि शिव विहार मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दरम्यान, दिल्लीत हिंसाचार होण्यास काही घटना कारणीभूत ठरल्या आहेत. दिल्लीत हिंसाचार उफाळण्यामागचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे…

२२ फेब्रुवारी रात्री १० वाजता - उत्तर पूर्व दिल्लीतील जाफराबाद मेट्रो स्टेशनखाली हळुहळू सीएएला विरोध करणाऱ्या महिलांची गर्दी जमू लागली होती. या महिलांनी स्टेशनखालील एका बाजूचा रस्ता बंद केला आणि आंदोलनास सुरुवात केली.

२३ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता - जाफराबाद मेट्रो स्टेशनखालील रस्ता बंद झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी रस्ता मोकळा करण्याचे आवाहन आंदोलकांना केले. दरम्यान, भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करून सीएए समर्थकांना मौजपूर चौक येथे गोळा होण्याचे आवाहन केले. दुपारी ३.३० ते ४ वाजता - सीएए समर्थकांसमोर कपिल मिश्रा यांनी प्रक्षोभक भाषण दिले. तसेच ३ दिवसांत रस्ता मोकळा करावा, अशी मागणी पोलिसांकडे केली.

२३ फेब्रुवारी ३.४५ ते ४ वाजता - बाबरपूर परिसरात सीएए समर्थकांवर काही जणांनी दगडफेक केली. - ४ ते ५ - मौजपूर, करावलनगर, बाबरपूर आणि चांदबाग परिसरात हिंसा आणि गोंधळ सुरू झाला. - रात्री ९ ते ११ - करावलनगर, मौजपूर, बाबरपूर आणि चांदबाग परिसरात दंगेखोरांनी अनेक वाहनांची जाळपोळ केली.

२४ फेब्रुवारी सकाळी १० वाजता - २३ फेब्रुवारी रोजी रात्री पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला होता. मात्र २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सीएए समर्थक आंदोलन करत विरोधकांपर्यंत पोहोचले. तिथे घोषणाबाजी करू लागले.

२४ फेब्रुवारी दुपारी १२ ते १.३० - दुपारी बाबरपूर परिसरात दगडफेक सुरू झाली. त्यानंतर या हिंसाचाराचे लोण करावलनगर, शेरपूर चौक, कर्दमपुरी आणि गोकलपुरीपर्यंत पोहोचले.

२४ फेब्रुवारी दुपारी २.३० ते ३.३० - भजनपुरा येथे बससह अनेक वाहनांची जाळपोळ, पेट्रोलपंपाला आग लावण्यात आली. हिंसाचारात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, डीसीपी जखमी

२४ फेब्रुवारी संध्याकाळी ७.३० ते ८ - सकाळी सुरू झालेला हिंसाचार रात्रीपर्यंत सुरू होता. गोकलपुरी परिसरात दंगेखोरांनी टायर मार्केटला आग लावली.

२४ फेब्रुवारी रात्री १० वाजता - रात्रभर हिंसाचार आणि तणाव होता. रात्री सुमारे १० वाजता घोंडा चौक आणि मौजपुर येथेही हिंसाचार सुरू झाला.

२५ फेब्रुबारी सकाळी ७ वाजता - दिल्लीतील मौजपूर आणि ब्रह्मपुरी येथे दगडफेक सुरू होती.

२५ फेब्रुवारी सकाळी १० ते २ - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वरिष्ठ अधिकारी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पाठोपाठ बैठका घेतल्या.

२५ फेब्रुवारी - दुपारी २ ते ४ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रुग्णालयात जाऊन दंगलीत जखमी झालेल्यांची भेट घेतली

२५ फेब्रुवारी संध्याकाळी ७ नंतर - दिल्लीतील अनेक भागात संचारबंदी लागू

२५ फेब्रुवारी - अजित डोवाल यांना दंगलग्रस्त भागाची केली पाहणी

२६ फेब्रुवारी - संचारबंदीमुळे जाफराबाद मेट्रो स्टेशन परिसरात शुकशुकात, आंदोलक परिसरातून हटले.

२६ फेब्रुवारी - दिल्ली दंगलीत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा १७ वर पोहोचला