ना जागा जिंकल्या, ना मतं मिळाली, तरीही दिल्लीच्या निकालाने काँग्रेस खूश, ही आहेत पाच कारणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 09:54 IST2025-02-09T09:48:58+5:302025-02-09T09:54:33+5:30
Delhi Election 2025 Result: दिल्लीत आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. तसेच आपच्या झालेल्या परभवामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांना आनंद होण्यासारखी एक दोन नव्हे तर पाच कारणं आहेत. तसेच यापैकी एक कारण तर असं आहे जे पाहून भाजपालाही जबरदस्त धक्का बसू शकतो. ही कारणं पुढील प्रमाणे...

दिल्ली विधानसभेच्या सलग तिसऱ्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केल्यानंतरही राज्यातील ७० जागांपैकी तब्बल ६७ ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. मात्र असं असलं तरी दिल्लीत आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. तसेच आपच्या झालेल्या परभवामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांना आनंद होण्यासारखी एक दोन नव्हे तर पाच कारणं आहेत. तसेच यापैकी एक कारण तर असं आहे जे पाहून भाजपालाही जबरदस्त धक्का बसू शकतो. ही कारणं पुढील प्रमाणे...
राष्ट्रीय राजकारणातील केजरीवाल यांचं वजन घटणार
यातील पहिलं कारण म्हणजे दिल्लीसारख्या छोट्या राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळत असले तरी मागच्या दहा वर्षात अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय राजकारणात मोठी झेप घेतली होती. अनेक राज्यांमध्ये त्यांनी आम आदमी पक्षाचा विस्तार केला होता. अनेक प्रादेशिक पक्षही अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला महत्त्व देत होते. मात्र आता दिल्लीत आप आणि स्वत: केजरीवाल पराभूत झाल्याने त्यांचं राष्ट्रीय राजकारणातील वजन घटण्याची शक्यता आहे. तसेच त्याचा फायदा हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांना होणार आहे.
हरयाणा आणि गुजरातमधील पराभवाचा वचपा
दिल्ली आणि पंजाब जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाने आपला वेगाने विस्तार करण्यास सुरुवात केली होती. तसेच आपच्या या धोरणाचा मोठा फटका काँग्रेसला बसत होता. काही महिन्यांपूर्वी हरयाणामध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने काँग्रेससोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढवली होती. तसेच आपला मिळालेल्या दोन-अडीच टक्के मतांमुळे अटीतटीच्या लढतीत काँग्रेसला पराभूत व्हावे लागले होते. तर काही वर्षांपूर्वी गुजरातमध्येही आपने पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवल्याने काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. आता दिल्लीमध्ये काँग्रेसने आपविरोधात पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवून मतविभाजन घडवले आणि आपमुळे झालेल्या पराभवांचा वचपा काढला.
पंजाबमध्ये सत्ता मिळवण्याचा मार्ग मोकळा
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे आता आपकडे केवळ पंजाबमधील सत्ता उरली आहे. अशा परिस्थितीत पुढच्या काळात पंजाबमधील सत्ता राखण्याचं मोठं आव्हान आम आदमी पक्षाकडे असणार आहे. २०२२ मध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकी आपने काँग्रेसचा दारुण पराभव करत सत्ता मिळवली होती. मात्र गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यातील १३ पैकी ७ जागा जिंकल्या होत्या. पंजाबमध्ये भाजपा आणि अकाली दल हे दुबळे झाले आहेत. तर दिल्लीतील पराभवामुळे आम आदमी पक्ष खचला आहे. अशा परिस्थितीत आपला पराभूत करून पंजाबची सत्ता मिळवण्याची संधी काँग्रेसकडे चालून आली आहे.
केजरीवाल यांना आघाडी करणं भाग पडणार
दिल्लीत झालेल्या पराभवामुळे अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील एकहाती वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत काँग्रेसचा जनाधार उरलेला नाही, असे सांगत केजरीवाल यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार दिला होता. मात्र कालच्या पराभवामुळे आगामी लोकसभा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसला बरोबरीचा दर्जा देऊन त्यांच्यासोबत आघाडी करणं अरविंद केजरीवाल यांच्यासाठी अपरिहार्य ठरण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या रणनीतीमुळे भाजपाला बसू शकतो धक्का
सद्यस्थितीत काँग्रेसकडे देशातील केवळ तेलंगाणा, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता आहे. कुठल्याही पक्षाला संघटना चालवण्यासाठी निधीची आवश्यकता असते. तसेच अधिकाधिक राज्यांमध्ये सरकार असंत तेव्हाच पक्षाला देणग्या मिळत असतात. त्यामुळे मागच्या दहा वर्षांपासून काँग्रेस पक्ष अनेक राज्यांत आघाडीसाठी मित्रपक्षांचा शोध घेत आहे. आता दिल्लीत झालेल्या पराभवामुळे स्वबळाची भाषा करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना दिल्ली, हरयाणा, पंजाब, गुजरात, गोवा आदी राज्यांमध्ये काँग्रेससोबत आघाडी करणं अपरिहार्य ठरणार आहे. तसं झाल्यास आप आणि काँग्रेसमधील मतविभाजनाचा फायदा घेऊन सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरणाऱ्या भाजपाला धक्का बसू शकतो.
अगदी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास भाजपाला येथे सुमारे ४५.५६ टक्के मतं मिळाली. तर आपला ४३.५७ टक्के मतं मिळाली. तर काँग्रेसने ६.३४ टक्के मतं मिळवल्याने अटीतटीच्या लढतीत मतविभाजनाचा फायदा भाजपाला झाला. त्यामुळे आता आप आणि काँग्रेस एकत्र आले तर अनेक राज्यांत भाजपाचं गणित बिघडू शकतं.