Corona Vaccination: जी चूक वाटली होती डेंजर, तीच ठरणार गेमचेंजर; कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मिळणार बूस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 11:31 AM2021-08-09T11:31:36+5:302021-08-09T11:35:37+5:30

Corona Vaccination: आयसीएमआरकडून कॉकटेल लसीकरणावर संशोधन; पुण्यात ९८ जणांवर प्रयोग

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. नागरिक घराबाहेर पडत आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.

तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरणाला गती देण्याची गरज आहे. मात्र अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत आहे. यानंतर आता मिक्स लसीकरणाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

कोरोना लसीकरण अभियानात सर्वाधिक वापर कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा केला जात आहे. त्यानंतर आता कॉकटेल लसीकरणाचा प्रयोग पुण्यात करून पाहिला गेला. कोवॅक्सिनचा एक आणि कोविशील्डचा दुसरा डोस दिला गेल्यास काय होतं, त्याची चाचणी करण्यात आली.

कॉकटेल लसीकरणाचा प्रयोग पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी संस्थेत केला गेला. यात ९८ जणांचा सहभाग होता. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (आयसीएमआर) हा प्रयोग करून पाहिला.

कोवॅक्सिन व कोविशिल्ड लस कोरोना रुग्णांना स्वतंत्रपणे देण्यापेक्षा या दोन्ही लसींचे मिश्रण दिल्यास ते अधिक प्रभावी ठरते, असं संशोधन सांगतं. या प्रयोगामुळे लसीकरण अभियानाला नवी दिशा मिळू शकते.

विशेष म्हणजे कॉकटेल लसीकरणाचा प्रयोग, संशोधन हे एका चुकीमुळे करावं लागलं. उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण अभियानादरम्यान एक मोठी चूक केली होती. मात्र हीच चूक आता गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील १८ जणांना पहिला डोस कोविशील्डचा देण्यात आला. त्यांना दुसरा डोसदेखील कोविशील्डचाच देणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना चुकून कोवॅक्सिनचा डोस दिला गेला. प्रकरण समोर येताच एकच खळबळ माजली.

जगभरात अनेक ठिकाणी मिक्स लसीकरणावर संशोधन सुरू आहे. मात्र भारतात तसं संशोधन झालं नव्हतं. पण उत्तर प्रदेशात झालेल्या एका चुकीमुळे लोक घाबरले. त्यामुळे आयसीएमआरनं मिक्स लसीकरणावर संशोधन केलं. त्यातून दिलासादायक निष्कर्ष समोर आले.

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील १८ जणांनी पुण्यात झालेल्या संशोधनात भीतीपोटी सहभाग घेतला नव्हता. या १८ जणांसोबत आयसीएमआरनं संपर्क ठेवला आहे. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष्य ठेवण्यात येत आहे.