CoronaVirus Updates: देशात नव्या 43 हजार 71 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 10:19 AM2021-07-04T10:19:15+5:302021-07-04T10:23:16+5:30

CoronaVirus Updates: राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे.

देशभरात गेल्या 24 तासांत 43 हजार 071 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 05 लाख 45 हजार 433 वर पोहचली आहे. देशात सध्या 4 लाख 85 हजार 350 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 52 हजार 299 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत 2 कोटी 96 लाख 58 हजार 078 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात 8,395 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 9,489 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 17 हजारांच्या वर आहेत. मालेगावमध्ये शनिवारी एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1289 तर कोल्हापूर शहरात 376 असे एकूण 1665 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,23,20,880 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,88,841 (14.39 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,32,949 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,422 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोनाचा आकडा काही दिवसांपासून रोजचा हजाराच्या आता येत असल्याचं चित्र आहे. मुंबईत शनिवारी 575 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत आतापर्यंत 6,97,991 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत शनिवारी 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8,297 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 752 दिवसांवर गेला आहे.