CoronaVirus: जगात भारी; कोरोनाविरोधातील प्रभावी अस्त्र ठरलेल्या 'हायड्रोक्लोरोक्वीन' औषधामागचा 'बापमाणूस'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 03:20 PM2020-04-11T15:20:26+5:302020-04-11T15:29:32+5:30

सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनावरील लस अद्याप तरी सापडलेली नसली, तरी उपचारादरम्यान हायड्रोक्लोरोक्वीन हे औषध उपयोगी ठरत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे जगभरातून या औषधाला मोठी मागणी आहे.

भारतात हायड्रोक्लोरोक्वीनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. त्यामुळे अमेरिकेसारख्या महासत्तेनंदेखील या औषधासाठी भारताशी संपर्क साधला. त्यावरुन या औषधाचं सध्याच्या काळातलं महत्त्व अधोरेखित होतं.

सध्याच्या घडीला संपूर्ण जगाला हायड्रोक्लोरोक्वीन हवं आहे. या हायड्रोक्लोरोक्वीनमुळे विस्मृतीत गेलेलं एक नाव पुन्हा एकदा जगाला आठवलंय, ते नाव आहे आचार्य प्रफुल्ल चंद्र राय यांचं.

प्रफुल्ल चंद्र राय यांनी स्थापन केलेल्या बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीनं सर्वप्रथम हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचं उत्पादन सुरू केलं. राय यांना भारतीय रसायनशास्त्राचं जनक समजलं जातं, यावरुन त्यांचं या क्षेत्रातलं स्थान लक्षात येईल.

आचार्य प्रफुल्ल चंद्र राय यांचा जन्म २ ऑगस्ट १८६१ चा. १८८७ मध्ये ईडनबर्ग विद्यापीठातून डीएससीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी प्रेसिडन्सी महाविद्यालयात अध्यापनाचं काम सुरू केलं.

बरीच खटपट करून वयाच्या ३१ व्या वर्षी म्हणजेच १८९२ मध्ये त्यांनी बंगालमधल्या एका प्रयोगशाळेत बंगाल केमिकल वर्क्सची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्याकडे ७०० रुपयांचं भांडवल होतं.

बंगाली तरुणांनी उद्योजक व्हावं, त्यांना उद्योग करण्याची प्रेरणा मिळावी या हेतूनं त्यांनी कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. स्थापनेनंतरच्या पुढच्याच वर्षी कंपनीनं वनौषधींपासून तयार केलेली उत्पादनं मेडिकल काँग्रेसच्या अधिवेशनात सादर केली.

प्रफुल्ल चंद्र राय यांनी लावलेलं एक छोटंसं रोपट वेगानं वाढू लागलं. अवघ्या नऊ वर्षात (१९०१) बंगाल केमिकल वर्क्सचं रुपांतर बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्समध्ये झालं. त्यावेळी यासाठी २ लाखांचा खर्च आला होता.

रसायनशास्त्रातल्या ज्ञानासोबतच राय यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्याचमुळे १९०८ पर्यंत राय यांच्या कंपनीचं नाव बंगालमध्ये मोठ्या आदरानं घेतलं जाऊ लागलं.

राय यांच्या नेतृत्त्वात कंपनीचा मोठ्या वेगानं विस्तार झाला. १९०५ मध्ये माणिकताळात कंपनीनं पहिला कारखाना सुरू केला. १९२० साली पानीहाटीत, तर १९३८ मध्ये मुंबईत बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्सनं कारखाने सुरू केले.

विशेष म्हणजे प्रफुल्ल चंद्र राय यांनी कधीही कंपनीकडून वेतन घेतलं नाही. राय यांनी १९३६ मध्ये निवृत्ती स्वीकारली.

१६ जून १९४४ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या कामाचा फायदा आजही देशाला होतो आहे. कर्तृत्ववान व्यक्ती काळाच्या पुढचा विचार करतात, याची प्रचिती राय यांच्या कारकिर्दीकडे पाहून येते.