coronavirus: विनवण्या करूनही कुणी नाही आले, शेवटी पीपीई किट घालून मुलगेच वडलांचा मृतदेह घेऊन गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 12:54 PM2020-07-23T12:54:36+5:302020-07-23T13:03:22+5:30

देशातील काही राज्यांमध्ये रुग्णांपर्यंत आरोग्य कर्मचारी पोहोचत नसल्याचे समोर येत आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे सध्या देशभरात चिंतेचे वातावरण आहे. दरम्याना वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्ययंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे. दरम्यान, देशातील काही राज्यांमध्ये रुग्णांपर्यंत आरोग्य कर्मचारी पोहोचत नसल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, असाच एक धक्कादायक प्रकार बिहारमध्ये घडला आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेशी वारंवार संपर्क करूनही एकही कर्मचारी न आल्याने अखेर मृत व्यक्तींच्या दोन मुलांनाच पीपीई किट घालून आपल्या वडिलांचा मृतदेह न्यावा लागला.

ही घटना पटनासिटी चौक ठाणे क्षेत्रातील हरमंदिर गल्ली परिसरात घडली. येथे एका ५० वर्षीय कोरोना रुग्णाला त्याच्या घरीच होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, २२ जुलै रोजी पहाटे चारच्या सुमारास या व्यक्तीची तब्येत बिघडून त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून संपूर्ण कुटुंब घराबाहेर आले. त्यानंतर मृत व्यक्तीचे कुटुंबीय आणि स्थानिकांनी प्रशासन आणि आरोग्य विभागाशी संपर्क साधला. मात्र वारंवार सांगितल्यानंतरही आरोग्य विभागाचा कुणी कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही. मात्र बऱ्याच वेळाने एक अॅम्ब्युलन्स आली.

शेवटी कुणीच न आल्याने मृत व्यक्तीच्या दोन मुलांनी स्वत:च पीपीई किट परिधान करून मृतदेह चादरीत लपेटून अॅम्ब्युलन्समध्ये घातले. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीवर कसा अंत्यसंस्कार केला जातो, याची माहिती आम्हाला नव्हती. दिवसभर वाट पाहिल्यानंतरही कुणी कर्मचारी पोहोचला नाही. तर १४ तासांनी एका ड्रायव्हरसोबत केवळ अॅम्ब्युलन्स पाठवण्यात आली.