CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात "या" राज्याने घेतला मोठा निर्णय; पहिली ते आठवीची शाळा 15 एप्रिलपर्यंत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:42 AM2021-03-31T11:42:56+5:302021-03-31T12:03:56+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,21,49,335 पोहोचला आहे. तर आतापर्यंत तब्बल 1,62,468 लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता पाऊल उचलली जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं महागात पडू शकतं.

कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एका राज्याने मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा ही 15 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. मध्य प्रदेश सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मध्य प्रदेशमध्ये 31 मार्च 2021 पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली होती. त्यामध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी शाळा न उघडण्याचे निर्देश दिले. तर 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा होणार असल्याचं सांगितलं आहे.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मध्य प्रदेशच्या शिक्षण विभागाने 1 ली ते 8 वीपर्यंतची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

मध्य प्रदेश सरकारने बोर्डाच्या परीक्षांचा विचार करुन 18 डिसेंबरपासून 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार विद्यार्थी आपल्या पालकांचं संमतीपत्र सादर करुन शाळेत उपस्थित राहू शकत होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

देशातील एका शहरात मास्कबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क न लावल्यास आता थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे.

इंदूरमधील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात येईल असं म्हटलं आहे.

कलेक्टर मनीष सिंह यांनी "आपण डेंजर झोनमध्ये आहोत. सावध राहण्याची आवश्यकता आहे. निर्बंधांची अंमलबजावणी कठोर स्वरुपात करण्यात येणार आहे. मास्कशिवाय रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांना आता थेट तुरुंगात धाडण्यात येईल" असं म्हटलं आहे.

मुंबईची आणि महाराष्ट्राची आकडेवारी आता चिंता वाढवणारी ठरत आहे. त्यामुळे मुंबई आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे हे संकेत आहेत. याच दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर 20 मार्चपासून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रोज हजारोच्या संख्येने रुग्ण वाढत आहे. महाराष्ट्रात झपाट्याने वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत 20 मार्चपासून महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लोक आपल्या खासगी वाहनानं येऊ-जाऊ शकतात.

बसेसवर घालण्यात आलेली बंदी कधीपर्यंत असेल हे परिस्थिती पाहून ठरवण्यात येईल, असं मध्य प्रदेश सरकारकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 53,480 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 354 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,21,49,335 वर पोहोचली आहे.