CoronaVirus News : 1 लाख कोरोनाग्रस्तांना मोफत देणार पतंजलीचं 'कोरोनिल किट'; 'या' सरकारने केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 09:33 PM2021-05-24T21:33:59+5:302021-05-24T21:50:49+5:30

CoronaVirus And Coronil : कोरोना रूग्णांमध्ये एक लाख पतंजली कोरोनिल किटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे असं म्हटलं आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची एकूण संख्या ही दोन कोटींच्या वर गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,22,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,454 जणांचा मृत्यू झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना व्हायरसशी लढणारं औषध शोधण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग सुरू असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या 'पतंजली' समूहाने कोविड-19 आजारावर 'कोरोनिल' या आयुर्वेदिक औषधाची घोषणा केली होती.

अश्वगंधा, गुळवेल, श्वासारी, तुळशी अशा वनौषधींपासून तयार करण्यात आलेलं औषध कोरोनारुग्णांना ठणठणीत बरं करू शकतं, त्याची यशस्वी चाचणीही आपण घेतलीय, असा बाबा रामदेव यांचा दावा होता.

कोरोनिल औषधामुळे कोरोना आठवड्याभरात बरा होत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र यामुळे मोठा वाद निर्माण झाला. औषधाच्या चाचण्या, ते तयार करण्यासाठी आवश्यक असलेले परवाने यावरून रामदेव बाबा आणि पतंजली वादात सापडले.

केंद्र सरकारसोबतच अनेक राज्यांनीदेखील कोरोनिलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर पतंजलीनं यू-टर्न घेतला. कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा कधीही केला नव्हता, असं म्हणत कोलांटीउडी मारली.

कोरोनाच्या या संकटात आता हरियाणा सरकारने आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. हरियाणामध्ये कोरोना रुग्णांमध्ये पतंजलीच्या एक लाख कोरोनिल किटचे वाटप करण्यात येणार आहे.

हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी (Anil Vij) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. हरियाणातील कोरोना रूग्णांमध्ये एक लाख पतंजली कोरोनिल किटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे असं म्हटलं आहे.

कोरोनिलचा निम्मा खर्च पतंजली व निम्मा हरियाणा सरकारच्या कोविड रिलीफ फंडातून केला जाणार आहे असे विज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हरियाणा सरकारने अ‍ॅलोपॅथीबाबत रामदेवबाबा यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतला असताना हा निर्णय घेतला आहे.

आयएमएने योगगुरु रामदेवबाबा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी योगगुरु रामदेवबाबा यांना पत्र लिहून विधान मागे घेण्यास सांगितले होते.

आयएमएने त्यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही या प्रकरणाची दखल घेतली होती. यानंतर रामदेव बाबांनी सपशेल शरणागती पत्करली असून ते वक्तव्य मागे घेतल्याचे ट्विट केले आहे.

हर्षवर्धन यांना ट्विट करताना त्यांनी तुमचे पत्र मिळाले. यासंदर्भात उपचार पद्धितींच्या या संघर्षपूर्ण वादाला मी इथे थांबवतो आणि मी केलेले वक्तव्य मागे घेतो असे रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी म्हटले आहे.