CoronaVirus Live Updates : सावधान! देशात कोरोना रिटर्न्स; 'या' राज्यांनी पुन्हा एकदा वाढवलं टेन्शन, तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 09:53 AM2022-04-15T09:53:32+5:302022-04-15T10:13:16+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोनाचा वेग मंदावला होता. पण पुन्हा एकदा काही राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची चर्चा सुरू झाली असून त्याचा धोका असल्याचं म्हटलं जात आहे.

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घातल्याने जग भीतीच्या सावटाखाली आहे. युरोपीय आणि आशियाई देशांमध्ये कोरोना विषाणूच्या चौथ्या लाटेचा कहर सुरूच आहे. अनेक देश ओमायक्रॉन आणि त्याच्या सब व्हेरिएंटचा सामना करत आहेत.

भारतात कोरोनाचा वेग मंदावला होता. पण पुन्हा एकदा काही राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची चर्चा सुरू झाली असून त्याचा धोका असल्याचं म्हटलं जात आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला आहे.

आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 949 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,21,743 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

राजधानी दिल्लीचा डेली पॉझिटिव्हिटी रेट 2.39 टक्क्यांवर पोहोचला आहे. भारतात 80 दिवसांनंतर आता पुन्हा काही राज्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. देशातील 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये XE प्रकारांची दोन प्रकरणे नोंदवल्यानंतर, आतापर्यंत कोणत्याही नवीन प्रकरणाची माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे.

गुरुवारी दिल्लीत एका दिवसात 325 नवीन रुग्ण आढळले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 915 वर गेली आहे. डेली पॉझिटिव्हिटी दर 2.39 टक्क्यांवर गेला आहे. दुसरीकडे, बुधवारी दिल्लीत 299 नवीन रुग्ण आढळले.

दिल्लीच्या शेजारच्या नोएडा आणि गुरुग्राममध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सुमारे 40 दिवसांनंतर गुरुग्राममध्ये 128 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील सक्रिय रुग्णांची संख्या 325 वर पोहोचली आहे.

नोएडामध्येही कोरोनाने कहर सुरू केला आहे. गुरुवारी गौतमबुद्ध नगरमध्ये 44 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये 15 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मुंबईत कोरोनाचे 73 नवीन रुग्ण आढळले आहेत. जे 17 मार्च 2022 नंतर सर्वाधिक आहेत. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, मुंबईत कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी सरकार लसीकरणावर भर देत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोविड-19 लसीकरणाची संख्या 186.29 कोटींच्या पुढे गेली आहे.

14 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लसीचे 5 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत, 12-14 वयोगटातील मुलांना लसीचे 2.38 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

ओमायक्रॉनलाच BA.1 व्हेरिएंट म्हटलं जातं. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे हे मुख्य कारण होतं. डब्ल्यूएचओने याला चिंतेचे स्वरूप मानले नाही कारण त्याची लक्षणे सौम्य होती. XE प्रकार Omicron च्या BA.1 आणि BA.2 या सब व्हेरिएंटपेक्षा 10 पट वेगाने पसरतो.

XE हा Omicron च्या दोन्ही सब व्हेरिएंटचा हायब्रिड आहे. प्राथमिक संशोधनानुसार, तपासादरम्यान XE प्रकार ओळखणे खूप कठीण आहे. Omicron आणि XE प्रकारातील लक्षणे जवळजवळ सारखीच आहेत.

अनेक राज्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. पण याच दरम्यान निष्काळजीपणा हा घातक ठरू शकतो. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्या असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.