CoronaVirus Live Updates : "सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट; वाचण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 09:18 AM2021-06-05T09:18:23+5:302021-06-05T09:33:41+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : नीती आयोगाच्या सदस्याने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात होऊ शकते, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी म्हटलं आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली असून तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही घट होत आहे. शुक्रवारी या संसर्गामुळे २,७१३ जण मरण पावले. गुरुवारपेक्षा हा आकडा १७४ ने कमी आहे. नव्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असून शुक्रवारी १ लाख ३२ हजार ३६४ नवे रुग्ण सापडले व २ लाख ७ हजार ७१ जण बरे झाले.

देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ८५ लाख ७४ हजार ३५० आहे. त्यातील २ कोटी ६५ लाख ९७ हजार ६५५ जण बरे झाले. कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३ लाख ४० हजार ७०२ इतकी आहे.

कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असून ते आता ९३.०८ टक्के झाले आहे. तर संसर्ग होण्याचे प्रमाण आता ६.५ टक्के आहे. देश अजूनही करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दिलासादायक बाब म्हणजे करोनाची ही दुसरी लाट ओसरत आहे.

नीती आयोगाच्या सदस्याने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात होऊ शकते, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी म्हटलं आहे. मात्र या लाटेपासून वाचण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे लसीकरण असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाने अतिशय चांगल्या प्रकारे सामना केला आहे. यामुळे कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पण तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारीही तेवढीच उत्तम झाली पाहिजे.

तिसऱ्या लाटेत तरुणांना संसर्गाचा धोका अधिक आहे, असं व्ही. के. सारस्वत यांनी म्हटलं आहे. देशातील महामारीबाबत तज्ज्ञांनी अतिशय स्पष्ट संकेत दिले आहेत. कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य आहे. ही लाट सप्टेंबर ते ऑक्टोबरपासून सुरू होईल, अशी शक्यता आहे.

शास्त्रज्ञांच्या आणि उद्योगांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन बँक, ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी उद्योग उभे करून महामारीचा यशस्वीपणे सामना केला. रेल्वे, विमानतळं, लिक्वीड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी सैन्य दलांचा उपयोग केला जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशातील व्यवस्थापन चांगले होते. यामुळेच दुसऱ्या लाटेला लवकर नियंत्रित करण्याचा विश्वास आपल्याला मिळाला. दुसऱ्या लाटेतही कोरोना व्यवस्थापन म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन चांगले होते, असं म्हटलं आहे.

देशात जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले पाहिजे असंही सारस्वत यांनी सांगितलं. आपण बऱ्याच अंशी चांगलं काम केलं आहे. आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगल्या प्रकारे सामना केला आहे. यामुळेच आता रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं ते म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशामध्ये सलग ४५ व्या दिवशी दररोज २ हजारपेक्षा जास्त बळी गेले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या १६ लाख ३५ हजार ९९३ असून ती गुरुवारपेक्षा ७७ हजार ८२० ने कमी आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे.

सलग २२ व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जगामध्ये १७ कोटी २९ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १५ कोटी ५८ लाख जण बरे झाले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

भारताला कोविड-१९ वरील जीवरक्षक लसीच्या लाखो मात्रा पाठविण्याचा निर्णय बायडेन प्रशासनाने घेतल्याची माहिती अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी फोनद्वारे दिली.

हॅरिस मेक्सिको आणि गुआतेमालाच्या प्रमुखांशीही फोनवर बोलल्या. बायडेन प्रशासन जूनअखेर जगात किमान ८० दशलक्ष लस वितरित करणार आहे. त्यातील पहिल्या २५ दशलक्ष लस मात्रा या देशांना देणार आहे.

जगभरामध्ये कोरोना लसींचे दोन अब्जांपेक्षा जास्त डोस लोकांना देण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणाची मोहीम जगभरात सुरू होऊन सहा महिने उलटले आहेत. जगात लसीकरणामध्ये इस्रायल आघाडीवर असून तेथील दहापैकी सहा लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.