Corona Vaccine : मोठा निष्काळजीपणा! कोरोना लसीचा तुटवडा असताना 'या' राज्यात तब्बल 3.48 लाख डोस गेले वाया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 04:11 PM2021-04-22T16:11:24+5:302021-04-22T16:28:59+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोना लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू असतानाच काही राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुडवडा भासत होता.

कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे.

कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या 24 तासांत तब्बल 3 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे.

गुरुवारी (22 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 3,14,835 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 2,104 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,59,30,965 पोहोचली.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,84,657 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 22,91,428 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,34,54,880 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

देशात कोरोना लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू असतानाच काही राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुडवडा भासत होता. त्यामुळे काही काळ लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात लसीचे डोस वाया गेल्याची घटना घडली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून आतापर्यंत राज्यात तब्बल कोरोना लसीचे 3.48 लाख डोस वाया गेले आहेत.

सध्या देशात 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण सुरू आहे. मात्र 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीला मोठ्या प्रमाणात मागणी असताना प्रशासनाचा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे.

देशात सर्वाधिक डोस हे तामिळनाडूमध्ये खराब झाले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचा नंबर लागतो. वेगाने लसीकरण सुरू असताना अशा घटना घडताना दिसत असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

रिपोर्टनुसार, जयपुरमध्ये सर्वाधिक 32319, नागौरमध्ये 25879, अलवरमध्ये 21736, जोधपूरमध्ये 19269, उदयपूरमध्ये 17276 डोस खराब झाले आहेत. तर जैसलमेरमध्ये 3489 आणि टोंकमध्ये 6069 डोस ख़राब झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयात रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

बिहारमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढतोय. याच दरम्यान पाटणा येथील एम्समध्ये (AIIMS )कोरोनाचा उद्रेक झाला आहे.

एम्समधील तब्बल 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. या घटनेने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्या आहेत.