CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! मांजर, कुत्रे आणि गायी-म्हशीही कोरोनाच्या विळख्यात; रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 12:04 PM2022-04-25T12:04:31+5:302022-04-25T12:17:41+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: . गुजरातमधील रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की हा धोकादायक व्हायरस प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींच्या वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,541 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,22,223 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगाने उपाययोजना केल्या जात आहेत. व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असून महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

काही देशांमध्ये प्राण्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पाळीव मांजरांना तसेच इतरही प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली होती.

कोरोना प्राण्यांमध्येही पसरू शकतो का? तर उत्तर 'हो' आहे. गेल्या दोन वर्षांत असे अनेक रिपोर्टमधून समोर आले होते जे प्राण्यांमध्ये कोरोना संसर्गाशी संबंधित होते. गुजरातमधील रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की हा धोकादायक व्हायरस प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो.

रिसर्चमध्ये म्हैस, गाय आणि कुत्रा यांसारख्या प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरस आढळून आला आहे. तथापि, रिसर्चमध्ये असेही म्हटले आहे की या संक्रमित प्राण्यांपासून हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका कमी आहे कारण या प्राण्यांमध्ये व्हायरसचा लोड कमी आहे.

कामधेनू विद्यापीठ आणि गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरच्या संशोधकांनी राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशातील घोड्यांपासून ते गायी आणि म्हशींच्या नाकांतून काही नमुने घेतले. यापैकी 24 टक्के प्राणी पॉझिटिव्ह आढळले असून एका कुत्र्यामध्ये डेल्टा प्रकार असल्याचे आढळून आले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, असं म्हटलं जात आहे की भारतात प्रथमच असे संशोधन करण्यात आले आहे, ज्यामध्ये हे समोर आले आहे की दुभत्या जनावरांनाही या व्हायरसची लागण होऊ शकते. याआधीच्या रिसर्चमध्ये मांजर आणि इतर प्राण्यांना संसर्ग झाल्याचे समोर आले होते.

अहमदाबाद, आनंद, गांधीनगर, बनासकांठा, पाटण, कच्छ आणि मेहसाणा जिल्ह्यातून नमुने गोळा करण्यात आले. शेवटचे नमुने मार्च 2022 मध्ये गोळा करण्यात आले होते. एकूण 95 जनावरे पॉझिटिव्ह आढळून आली असून त्यात 67 कुत्रे, 15 गायी आणि 13 म्हशींचा समावेश आहे.

संशोधनाचा उद्देश प्राणी आणि माणसांमधील व्हायरसच्या प्रसाराचा सखोल अभ्यास करणे हा होता कारण कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्राण्यांना संसर्ग झाला होता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

संशोधनात असे दिसून आले आहे की हा व्हायरस या प्राण्यांमध्ये माणसांच्या जवळ असल्यामुळे आला आहे, परंतु याच्या विरुद्ध पद्धतीने लागू होऊ शकत नाही. तथापि, मांजरीच्या प्रजातींबद्दल अधिक माहिती गोळा करणे आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

श्वान, मांजर या पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग माणसांना होण्याचा धोका नाही असं रिसर्चमधून समोर आलं आहे. मात्र काळजी घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. पाळीव प्राण्यांपासून कोरोनाची लागण होण्याचा धोका अतिशय कमी असल्याचं याआधी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे