CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! दर तासाला कोरोना घेतोय 14 जणांचा बळी; मृत्यूदरात महाराष्ट्राचा नंबर चौथा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 05:57 PM2021-10-26T17:57:25+5:302021-10-26T18:11:08+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात जुलैमध्ये कोरोनामुळे होणाऱ्य मृत्यूच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता चौथ्या क्रमांकावर आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 24 कोटींवर गेली असून एकूण रुग्णसंख्या 244,969,132 वर पोहोचली आहे. तर 4,973,465 लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे अनेक प्रगत देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी रुग्णांचा आणि मृतांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. तर आता पर्यंत लाखो लोकांनी कोरोनावर मात केली असून 222,073,375 जण कोरोनातून आता बरे झाले आहेत.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,428 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 356 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.

देशात जुलैमध्ये कोरोनामुळे होणाऱ्य मृत्यूच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता चौथ्या क्रमांकावर आहे. मृत्यूदरात पंजाब राज्य पहिल्या क्रमांकावर, उत्तराखंड दुसऱ्या आणि नागालँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दर तासाला कोरोना 14 लोकांचा बळी घेत आहे.

जुलैमध्ये मृत्यूदर 2.02 टक्के होता, तो आता 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबरपासून हा मृत्यूदर स्थिर आहे. राज्यातील 10 फेब्रुवारी ते 22 ऑक्‍टोबर या कालावधीतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा काढला तर दर तासाला सरासरी 14 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.

सप्टेंबरपर्यंत राज्यात दर तासाला मृत्यूची संख्या 16 होती, ती ऑक्टोबरमध्ये ती थोडी कमी झाली असल्याने दिलासा मिळत आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाची दुसरी लाट 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.

9 मार्च 2020 रोजी सुरू झालेल्या साथीच्या आजाराने आतापर्यंत 1,39,925 लोकांचा बळी घेतला आहे. पहिल्या लाटेत 9 फेब्रुवारीपर्यंत 51,360 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून म्हणजेच 10 फेब्रुवारी ते 28 सप्टेंबरपर्यंत 87,542 लोकांचा मृत्यू झाला.

22 ऑक्टोबरपर्यंत ही संख्या 88,565 वर पोहोचली. कोरोना डेथ ऑडिट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मृत्यूचा आलेख एप्रिलपासून वाढला असून जुलैमध्ये घटला आहे.

मृत्यूचे प्रमाण वाढले असले तरी मृतांच्या संख्येत वाढ झालेली नाही. या महिन्यात राज्यातील मृतांचा आकडा दोन अंकी राहीला आहे. 24 दिवसांत मृतांची संख्या 2 पेक्षा कमी झाली आहे. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी 2021 मध्ये आपण अनेक रुग्ण पाहिले आहेत, ज्यांचा अचानक मृत्यू होतो असं म्हटलं आहे.

राज्यात 22 सप्टेंबरपर्यंत 1,39,925 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 63 टक्के मृत्यू दुसऱ्या लाटेच्या 254 दिवसांत झाले आहेत. या दिवसांमध्ये 88,565 लोकांना आपला जीव गमवावा लागला. नवभारत टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत. याच दरम्यान काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं.

सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. घरच्या घरीच सण साजरे करा. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

देशाला कदाचित दुसऱ्या कोरोना लाटेसारखा फटका बसणार नाही असं आता तज्ज्ञांनी म्हटलं आहे. सध्या भारतात जरी कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होत असली तरी कोरोना पूर्ण कमी होईल, असे म्हटले जाऊ शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

देशात दिवाळी यासारखे अनेक सण पाहता तज्ञांनी इशारा दिला आहे. सध्याच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये घट होणे हे कोरोना संपत असल्याचे लक्षण नाही. अनेक ठिकाणी आजही मृत्युदर जास्त असल्याने काळजी घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

Read in English