Corona Vaccine : कोरोना लसीचा एक डोस मृत्यू रोखण्यात ८२ टक्के सक्षम; संपूर्ण लसीकरणानंतर ९५ टक्के संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 11:08 AM2021-06-23T11:08:16+5:302021-06-23T11:14:21+5:30

Covid Vaccine Study: ICMR-NIE च्या संशोधनातून खुलासा. कोरोना लसीचा एक डोसही मृत्यू रोखण्यात सक्षम.

Covid Vaccine Study: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. लसीकरण हा यावरील प्रभावी उपाय असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे.

दरम्यान, एका कोरोनाची लस ही प्रभावी असल्याचं एका संशोधनातून स्पष्ट झआलं आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा एक डोस यापासून होणारे मृत्यू रोखण्यातही बऱ्यापैकी सक्षम असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च- नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीच्या (ICMR-NIE) संशोधनानुसार कोरोना लसीचा एक डोस कोरोना विषाणूपासून होणारे मृत्यू थांबवण्यात ८२ टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे. तर कोरोना लसीचे दोन डोस हे ९५टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.

कोरोना विषाणूपासून होणारे मृत्यू थांबवण्यासाठी कोरोना लस किती प्रभावी आहे याचा अभ्यास तामिळनाडूच्या हाय रिस्क ग्रुपमध्ये करण्यात आला. याचा अहवाल इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये २१ जून रोजी प्रकाशित करण्यात आला.

तामिळनाडूच्या पोलीस विभागानं दुसऱ्या लाटेदरम्यान आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा झालेला मृत्यू आणि लसीकरणाचे डोस (एक किंवा दोन) याची माहिती आपल्या रेकॉर्डमध्ये ठेवली होती.

याशिवाय विभागानं रुग्णालयात भरती होणं आणि लसीकरणाच्या तारखेचाही रेकॉर्ड ठेवला होता. इंडियन एक्स्प्रेससोबत चर्चा करताना आयसीएमआर-एमआयआयचे अध्यक्ष डॉ. मनोहर मुर्हेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

या डेटाचा वापर लसीकरण झालेले पोलीस कर्मचारी आणि लस न घेतलेले पोलीस कर्मचारी यांचा कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत अभ्यास करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

तामिळनाडू पोलीस विभागात १,१७,५२४ पोलीस कर्मचारी आहेत. १ फेब्रुवारी ते १४ मे दरम्यान ३२,७९२ पोलीस कर्मचाऱ्यांना लसीचा एक डोस, तर ६७६७३ पोलीस कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस देण्यात आले.

१७,५०९ पोलीस कर्मचाऱ्यांना यादरम्यान लसीचा एकही डोस मिळाला नाही. १३ एप्रिल ते १४ मे दरम्ंयान ३१ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

यापैकी चार कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस, तर सात जणांना एक डोस आणि अन्य २० कर्मचाऱ्यांना एकही डोस देण्यात आला नव्हता.

लसीकरण झालेल्या आणि लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचा अभ्यास करून कोरोना लसीशी निगडीत मोर्टेलिटी रिस्क मोजण्यात आली.

यानुसार कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या १ हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागे १.१७ लोकांचा मृत्यू झाला. तर एक डोस घेतलेल्यांमध्ये ही संख्या ०.२१ आणि दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये ही संख्या ०.०६ इतकी होती.