भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:24 IST2025-08-13T14:19:50+5:302025-08-13T14:24:41+5:30

देशाची राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सचिव पदासाठी झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत भाजपा खासदार राजीव प्रताप रूडी विजयी झाले आहेत. भाजपा विरुद्ध भाजपा या लढाईत रूडी यांनी त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. संजीव बालियान यांना १०० मतांनी हरवले आहेत.

१२ ऑगस्टला झालेल्या या निवडणुकीत अमित शाह, सोनिया गांधी यांच्यापासून अनेक दिग्गजांनी मतदान केले. रूडी १०० हून अधिक मताधिक्यांनी विजयी झाले. त्यांच्या पॅनेलमधील सदस्यांनीही विजय मिळवला. या निवडणुकीत १२९५ विद्यमान खासदार आणि ६८० हून अधिक माजी खासदारांनी मतदान केले होते. बालियान हे अमित शाह यांचे उमेदवार मानले जात होते.

भाजपाच्या बहुतांश खासदारांनी बालियान यांनाच मते दिली, परंतु विरोधी पक्षात काँग्रेससह इतर पक्षांनी उघडपणे रूडी यांना साथ दिली. रूडी यांनी या निवडणुकीत बरीच तयारी आणि मेहनत केली होती. २५ वर्षापासून कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या सचिवपदावर असलेले रूडी पुन्हा जिंकले. माझ्या पॅनेलमध्ये भाजपा, काँग्रेस, सपा, टीएमसी, टीडीपी आणि इतर अपक्ष समावेश होते असं रूडी यांनी सांगितले.

मात्र संजीव बालियान यांचा पराभव एकप्रकारे भाजपाचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह यांचा पराभव असल्याचे बोलले जाते. काही भाजपा खासदार रूडी यांचा विजय निश्चित होता असं म्हटलं. आधीपासून बरेच खासदार रूडी यांच्या बाजूने होते. त्यामुळे शाह यांना या निवडणुकीशी जोडून पाहणे योग्य नाही असं भाजपाचे खासदार म्हणतात.

विरोधी पक्षाने या निवडणुकीत रूडी यांना उघडपणे पाठिंबा दिला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही रूडी यांचे कौतुक केले. काही दिवसांपूर्वी संसद भवनातील राहुल गांधींसोबत भेटीचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. जो खूप काही सांगत होता. त्यामुळे या निवडणुकीतील निकाल अमित शाह यांचा पराभव म्हणून आणि भाजपामधील अंतर्गत मतभेद यादृष्टीने प्रसारित केला जात आहे.

रूडी यांना काँग्रेस आणि दुसऱ्या विरोधी पक्षातील खासदारांचे समर्थन मिळाले. विरोधी खासदार बालियान यांना सरकारचा उमेदवार म्हणून पाहत होते. १२ ऑगस्टला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी डिनर डिप्लोमेसीही सुरू होती. ही निवडणूक भाजपा नेत्यांमध्ये होणार होती म्हणून भाजपा खासदारही गोंधळात होते. पहिल्यांदाच अशी वेळ आल्याने खासदार संभ्रमात असल्याचे कंगना राणौतने म्हटलं होते.

या निवडणुकीवर राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नजर होती. या क्लबच्या ११ कार्यकारी सदस्यांच्या पॅनेलमध्ये रूडी यांनी सर्व पक्ष आणि सर्व राज्यांची काळजी घेतली होती. रूडी यांना भाजपाच्या काही खासदारांची साथ मिळाली आणि विरोधकांनी रुडी यांना भरभरून मतदान केले. त्यामुळे हा विजय सोपा झाला.

संजीव बालियान यांच्यासाठी निशिकांत दुबे यांनी मोर्चा सांभाळला होता. दुबे गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जाते. निशिकांत दुबे यांनी कॉन्स्टिट्यूशन क्लबवर दलालांनी कब्जा केल्याचा गंभीर आरोप केला होता. २००९ पासून या क्लबच्या सचिवपदी रूडी विराजमान आहेत. त्यावेळी त्यांनी रामनाथ कोविंद यांना हरवले होते.

संजीव बालियान पश्चिमी उत्तर प्रदेशातील भाजपाचे जाट समुदायातील मोठे नेते आहेत. २०१३ साली धार्मिक दंगलीनंतर भाजपाने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. पहिल्या निवडणुकीत त्यांनी २०१४ साली कादिर राणा यांना ४ लाखाहून अधिक मतांनी मात दिली होती. तेव्हापासून त्यांचे भाजपामधील वजन चांगलेच वाढले.

नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात संजीव बालियान यांना मंत्री बनवण्यात आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बालियान यांनी राष्ट्रीय लोकदलाचे दिवंगत अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांना साडे सहा हजार मतांनी हरवले होते. त्यानंतर पुन्हा ते केंद्रात मंत्री बनले. परंतु २०२४ साली समाजवादी पक्षाने संजीव बालियान यांचा पराभव केला.