बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
By बाळकृष्ण परब | Updated: November 14, 2025 13:38 IST2025-11-14T13:34:55+5:302025-11-14T13:38:37+5:30
Bihar Election Result: बिहारमधील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आज जाहीर होत असलेल्या निकालामध्ये एनडीएला एवढा मोठा विजय कसा काय मिळाला याची ५ प्रमुख कारणं पुढील प्रमाणे.

बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, यामध्ये सत्ताधारी एनडीएने प्रचंड बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर विरोधी पक्षांची महाआघाडी दारुण पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. बिहारमधील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आज जाहीर होत असलेल्या निकालामध्ये एनडीएला एवढा मोठा विजय कसा काय मिळाला याची ५ प्रमुख कारणं पुढील प्रमाणे.

बेरजेचं राजकारण
बिहारमध्ये एनडीएला मिळालेल्या बंपर विजय मिळण्यात निर्णायक ठरलेली पहिली बाब म्हणजे एनडीएनं केलेलं बेरजेचं राजकारण हे होय. बिहारमध्ये आरजेडी, जेडीयू आणि भाजपा हे प्रमुख तीन पक्ष आहेत. यापैकी दोन पक्ष ज्या बाजूने असतात, त्यांची सहज सत्ता येणे सोपं होतं. यावेळी भाजपा आणि जेडीयू एकत्र लढत होते. तर एलजेपी (रामविलास), हम आणि आरएलपी हे ठरावीक जनाधार असलेले पक्षही एनडीएमध्ये होते. त्यामुळे सत्ता राखण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांसी जुळणी एनडीएकडे सहज झाली.

नितीश कुमार यांची प्रतिमा
२००५ पासून मधला काही काळ वगळता बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर असलेल्या नितीश कुमार यांची प्रतिमा बऱ्यापैकी स्वच्छ आहे. त्यांच्यावर वैयक्तिक भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. तसेच बिहारच्या शासन आणि प्रशासनाला शिस्त लावल्याने सुशासन बाबू ही ओळख मिळालेली ओळक नितीश कुमार यांनी जपली आहे. प्रतिस्पर्धी तेजस्वी यादव यांच्या आक्रमक अंदाजाच्या तुलनेत नितीश कुमार यांचा हा चेहरा बिहारमधील मतदारांना भावला.

जंगलराजचं भय
बिहारमध्ये १९९० ते २००५ या काळात लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाची सत्ता होती. हा काळ बिहारमधील जंगलराज म्हणून ओळखला जातो. सध्याच्या तरुणाईला याची कल्पना नसली तरी बिहारमधील बहुतांश प्रौढ आणि वयस्कर मतदारांना त्याची कल्पना आहे. त्यामुळेच तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आल्यानंतर एनडीएने जंगलराजची भीती मतदारांच्या मनावर बिंबवण्यास सुरुवात केली. त्याचाही एनडीएला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला.

जातीपातीचं राजकारण
देशातील इतर कुठल्याही भागाच्या तुलनेत बिहारमध्ये अजूनही जातीपातीच्या राजकारणाचा पगडा आहे. त्यामुळेच बिहारमध्ये प्रचारात कुठलेही मुद्दे असले तरी मतदान हे जातीवरच होतं. त्यामुळेच ज्याच्या बाजूने जास्त जाती तो बाजी मारून जातो. गेल्या विधानसभा निवडणुकी चिराग पासवान वेगळे लढल्याने एनडीएला फटका बसला होता. मात्र या निवडणुकीत एनडीएमध्ये भाजपा, जेडीयू, एलजेपी, हम आणि आरएलएसपी अशा पाच पक्षांची मोट बांधली गेल्यानं जातींचं आणि मतांचं समिकरण अचूक जुळलं.

महिलांना दिलेले १० हजार रुपये
बिहारमधील विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कोट्यवधी महिलांना १० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या नावाखाली दिली. याचा मोठा सकारात्मक परिणाण झाला. तसेच महिला मतदार एनडीएकडे मोठ्या प्रमाणावर वळल्या.

















