Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 22:31 IST2025-09-18T22:07:37+5:302025-09-18T22:31:56+5:30

Sebi Clean Chit To Gautam Adani Group in Hindenburg Research Case: सेबीने दिलेली क्लीन चिट अदानी समूहासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

Sebi Clean Chit To Gautam Adani Group in Hindenburg Research Case: हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर मोठे आरोप केले होते. त्याचा अदानी समूहाला मोठा फटका बसला. अदानी समूहाचे अनेक शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले. अद्यापही त्यातील अनेक शेअर्स रिकव्हर झालेले नाहीत, असे म्हटले जात आहे. या प्रकरणाची चौकशी सेबीकडून केली जात होती. यात Adani समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे.

गौतम अदानी आणि अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. भांडवली बाजार नियामक ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ अर्थात ‘सेबी’ (SEBI) ने अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने (Hindenburg Research) अदानी समूहावर केलेले स्टॉक मॅनिप्युलेशनचे आरोप फेटाळून लावले आहेत.

सेबीने अदानी समूहावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत असे म्हटले आहे. तसेच सेबीने गौतम अदानी, राजेश अदानी, अदानी पोर्ट आणि अदानी पॉवर याच्याविरोधात दंड किंवा कारवाईची शक्यताही नाकारली आहे. एकंदरीच हिंडनबर्गने केलेल्या प्रकरणात सेबीने अदानी समूहाला क्लीन चीट दिली आहे.

कोणतेही उल्लंघन झाल्याचे आढळून आले नाही, संबंधित नसलेल्या पार्टीबरोबरच्या अशा प्रकारच्या व्यवहारांसाठी त्यावेळी रिलेटेड पार्टी डिलिंग्ज ही व्याख्या लागू नव्हती, असे सेबीने दोन वेगवेगळ्या आदेशांमध्ये नमूद केले आहे.

सेबीने असेही नमूद केले आहे की, कर्जांची व्याजासह परतफेड करण्यात आली, तसेच कोणताही निधी बाहेर वळवला गेला नाही. त्यामुळे कोणतीही फसवणूक किंवा ‘अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस’ झाली नाही. त्यामुळे अदानी समूहाविरोधातील सर्व प्रकरणे बंद करण्यात आली आहेत.

संपूर्ण चौकशीनंतर, सेबीने हिंडेनबर्गचे दावे निराधार होते याची पुष्टी केली आहे. हे आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत. पारदर्शकता आणि सचोटी नेहमीच अदानी समूहाची व्याख्या करते. या फसव्या आणि प्रेरित अहवालामुळे ज्या गुंतवणूकदारांचे पैसे गमावले, त्यांचे दुःख आम्ही मनापासून समजू शकतो.

खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांनी देशाची माफी मागावी. भारताच्या संस्थांप्रती, भारताच्या जनतेप्रती आणि राष्ट्र उभारणीप्रती आमची वचनबद्धता अढळ आहे. सत्यमेव जयते! जय हिंद!, असे गौतम अदानी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबत त्यांनी भारताचा तिरंगा झेंडा फोटो म्हणून जोडला आहे.

दरम्यान, हिंडेनबर्गने आरोप केला होता की अदानी समूहाने अॅडिकॉर्प इंटरप्रायजेस, माइलस्टोन ट्रेडलिंक्स, आणि रेहवार इन्फ्रास्ट्रक्चर या तीन कंपन्यांचा वापर अदानी ग्रुप फर्म्समध्ये पैसे वळवण्यासाठी केला. यानंतर असा दावा केला गेला की, यामुळे अदानी समूहाला गुंतवणूकदारांची दिशाभूल होऊ शकते अशा रिलेटेड पार्टी ट्राजिक्शन संबंधी नियम टाळण्यात मदत झाली.

त्यानंतर, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने सेबीला चौकशी करण्याचे आदेश दिले. अदानी समूहाने माइलस्टोन आणि रेहवार सारख्या कंपन्यांद्वारे निधी वळवला, व्यवहार लपवण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप करण्यात आला.

यानंतर सेबीने चौकशी केली. सेबीने असेही म्हटले आहे की, निधीचा गैरवापर झाल्याचा किंवा भागधारकांना कोणतेही नुकसान झाल्याचा कोणताही पुरावा नाही. सेबीने असा निष्कर्ष काढला की, नोटीस जारी करणाऱ्यांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत.

यानंतर सेबीने चौकशी केली. सेबीने असेही म्हटले आहे की, निधीचा गैरवापर झाल्याचा किंवा भागधारकांना कोणतेही नुकसान झाल्याचा कोणताही पुरावा नाही. सेबीने असा निष्कर्ष काढला की, नोटीस जारी करणाऱ्यांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत.

सेबीने दिलेली क्लीन चिट अदानी समूहासाठी मोठा दिलासा आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर, अदानी समूहाला कामकाज, पारदर्शकता आणि निधीबाबतच्या असंख्य प्रश्नांना तोंड द्यावे लागले होते. अदानी समूहाने सुरुवातीपासूनच हे आरोप फेटाळून लावले होते.